23 March 2019

News Flash

कार्बन डायऑक्साइडच्या इंजेक्शनमुळे सडपातळ होण्यास मदत

पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कार्बन डायऑक्साइड वायूचे इंजेक्शन दिल्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होत असल्याचे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. कार्बोक्सी उपचार हे चरबी कमी करण्याचे एक नवे आणि प्रभावी माध्यम ठरू शकते. परंतु हे दीर्घकाळासाठी परिणामकारक ठरविण्यासाठी यावर अधिक काम करण्याची आवश्यकता असल्याचे अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील मुराद अलाम यांनी सांगितले. हा एक सुरक्षित आणि स्वस्त वायू आहे. आणि चरबीयुक्त भागात या वायूचे इंजेक्शन देण्यास नैसर्गिक उपचारपद्धतीला पसंती देणाऱ्या रुग्णांकडून प्राधान्य दिले जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. हा अभ्यास ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ डरमेटॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोणतीही शस्त्रक्रिया न करता चरबी कमी करण्याकडे सध्या रुग्णांचा कल जास्त असल्याचे अलाम यांनी सांगितले. सध्या क्रोलिपोलोसिस, उच्च तीव्रता अल्ट्रासाऊंड, रेडिओफ्रिक्वेन्सी, रासायनिक एडिपिक सायटोलायसिस, लेझरच्या साहाय्याने चरबी कमी करणे आदी उपचार कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेविना केल्या जातात. कार्बोक्सी उपचारपद्धती अमेरिकेबाहेरील देशांमध्ये सर्वाधिक वापरली जाते. काही अभ्यासांनुसार याचे ओटीपोटावरील चरबी कमी होत असून त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात. ही उपचारपद्धती कुठल्या प्रकारे काम करते हे अजून स्पष्ट झाले नसून कार्बन डायऑक्साइडच्या इंजेक्शनमुळे चरबीच्या पेशींचे नुकसान होते असे मानले जाते. यासाठी १६ लोकांवर अभ्यास करण्यात आला. पाच आठवडे आठवडय़ांतून एकदा त्यांच्या पोटावर चरबीयुक्त भागात कार्बन डायऑक्साइडचे इंजेक्शन देण्यात आले. पाच आठवडय़ानंतर त्यांच्या चरबीत घट कमी झाल्याचे दिसून आले. परंतु हे बदल २८ आठवडय़ांपर्यंत राहिले नाहीत.

First Published on June 14, 2018 12:56 am

Web Title: carbon dioxide