22 April 2019

News Flash

‘सीएमआर’ चाचणीतून मृत्यूच्या धोक्याचा अंदाज

मृत्यूची जोखीम असलेले रुग्णही ओळखता येतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

कार्डियाक मॅग्नेटिक रेसोनन्स (सीएमआर) अर्थात हृदयाच्या चुंबकीय अनुनाद चाचणीमुळे शरीरात कोणतेही उपकरण अंतर्भूत न करता हृदयरोगाची तीव्रता तर कळतेच, शिवाय मृत्यूची जोखीम असलेले रुग्णही ओळखता येतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

अमेरिकेतील डय़ूक विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, हृदयरोगाच्या चाचणीसाठी केल्या जाणाऱ्या स्ट्रेस  इकोकार्डिओग्राम, कॅथेटेरिसॅशन आणि स्ट्रेस न्युक्लिअर चाचणी यांना अप्रत्यक्ष, निर्धोक पर्याय म्हणून ही (सीएमआर) पद्धत उपयुक्त ठरू शकते.

याबाबत डय़ुक विद्यापीठाचे रॉबर्ट जुड म्हणाले की, ‘हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या विकारांचे निदान करण्यासाठी ‘सीएमआर’ ही प्रभावी चाचणी असल्याचे आम्हाला माहीत होतेच, पण अजूनही तिचा मोठय़ा प्रमाणात उपयोग केला जात नाही. अमेरिकेत केल्या जाणाऱ्या तणाव चाचण्यांत या चाचणीचे प्रमाण केवळ एका टक्क्याहूनही कमी आहे.’ ‘सीएमआर’चा वापर वाढवण्यातील एक प्रमुख अडथळा म्हणजे या चाचणीच्या अंदाज मूल्याबाबत उपलब्ध नसलेली आकडेवारी हा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘सीएमआर’ आणि इतर तंत्रज्ञान यांच्यातील तुलना ही निश्चित माहिती देणारी ठरली असती, तरी आमच्या अभ्यासातूनही याबाबत काही स्पष्टता आली आहे, असा दावा त्यांनी केला.

संशोधकांनी या अभ्यासासाठी नऊ हजारांहून अधिक रुग्णांची माहिती तपासली. दहा वर्षांच्या कालावधीत उपचार घेतलेल्या या रुग्णांवर अमेरिकेतील सात रुग्णालयांमध्ये ‘सीएमआर’ चाचण्या करण्यात आल्या होत्या. पारंपरिक वैद्यकीय निकषांनुसार ज्या रुग्णांत यापूर्वी हृदयरोगाची लक्षणे दिसली नाहीत, किंवा या विकारांची कमी जोखीम दिसून आली, त्यांच्यापैकी ज्यांची सीएमआर चाचणी समस्या दर्शविणारी आली, त्यांच्या मृत्यूचा धोका इतरांच्या तुलनेत ३.४ पट अधिक होता.

First Published on February 11, 2019 12:17 am

Web Title: cardiac magnetic resonance