रस्त्यावरून जात असताना रामभाऊंना रिक्षाचा धक्का लागला आणि मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले.. झोपेत पलंगावरून पडून चाळिशीच्या मनोजच्या कंबरेचे हाड मोडले.. रेश्माचा पाय बाथरूममध्ये घसरला आणि मणक्याचे हाड मोडले.. या आणि अशा अनेक घटना आपल्या अवतीभोवती रोजच घडत असतात. यामागचे खरे कारण जोपर्यंत आपली हाडे मोडत नाहीत तोपर्यंत आपण लक्षातच घेत नाही. भारतात ऑस्टिओपोरोसिसच्या (हाडे ठिसूळ बनणे) रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खरेतर हाडांची घनता कमी होण्याला आपली जीवनशैली प्रामुख्याने जबाबदार असल्याचे आपण मान्यच करत नाही. त्यामुळेच हाडे ठिसूळ होऊन छोटय़ाशा धक्क्यानेही फ्रॅक्चर होते.
वृद्धावस्थेत होणारा हा आजार आता तारुण्यातच होऊ लागला आहे. मांसाहार करणाऱ्यांच्याबाबतीत हे प्रमाण जरी कमी असले तरी योग्य व्यायाम व आहार-विहारावर नियंत्रण न ठेवल्यामुळे मांसाहारींमध्येही ऑस्टिओपोरोसिस दिसून येतो. २० ऑक्टोबर २०१५ हा ‘जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस’. जगभरात ऑस्टिओपोरोसिसमुळे दरवर्षी आठ कोटी नऊ लाख लोकांची हाडे मोडतात. हाडांची कठीणता कमी होणे म्हणजे त्यातील ठिसूळपण वाढल्यामुळे हाडे मोडण्याचे प्रमाण वाढते. कमी प्रोटीन, कॅल्शियमचा अभव तसेच ‘ड’ जीवनसत्त्व कमी असल्यामुळे हा आजार उद्भवतो, असे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिहीर रणनवरे यांनी सांगितले. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण अधिक असून जसजसे वय वाढते तसे हाडे ठिसूळ होण्याचा धोकाही वाढतो, असे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमधील स्पाइन सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पशट्टीवार यांनी सांगितले.

प्रामुख्याने नोकरदार महिला-पुरुषांमध्ये चाळिशीनंतर हा त्रास उद्भवू लागला असून शाकाहरी व्यक्तींनी यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. डॉ. मिहीर यांच्या म्हणण्यानुसार बैठे काम करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. नियमित चालणे, व्यायाम करणे याचबरोबर आहारात सोयाबिन, डाळ, राजमा व छोले यांचा जास्तीतजास्त वापर केला पाहिजे. पुरेशी प्रथिने शरीराला मिळणे अत्यावश्यक असून गव्हाच्या पिठात सोयाबिनचे पीठ मिसळून पोळ्या करता येऊ शकतात, तसेच त्याची भाजीही खाता येते. तथापि पुरेशी प्रथिने, कॅल्शियम व ‘ड’ जीवनसत्त्व मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा वृद्धापकाळातील आजार तारुण्यात उद्भवू शकतो.