देशभरात स्वाइन फ्लूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर जनजागृती मोहीम अधिक सक्षम करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी योग्य धोरण ठरविण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या अधिकारांना राज्य सरकारांशी सल्लामसलत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आपल्या खात्यातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरावीक हंगामात बळावणाऱ्या या आजाराच्या नियंत्रणाविषयीच्या तरतुदीचा आढावा घेतला. या वेळी अधिकारीवर्गाला आवश्यक उपाययोजनांची पूर्तता करण्यासोबतच औषधांची उपलब्धता, प्रशिक्षण, सल्लागारांची नियुक्ती आणि राज्य सरकारला मार्गदक्र्षक तत्त्वाची रूपरेषा आखण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्यांची आणि या विकाराची बाधा झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या राज्यांवर सर्वाधिक लक्ष देण्यात येणार आहे. केंद्राकडून विविध राज्यांमध्ये यासंदर्भात सल्लागारांची नियुक्ती करताना विकाराला नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजनाही हाती घेतल्या जाणार आहेत. या विकारावर मात करण्यासाठी उपाययोजनाही लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
केंद्राकडून राज्य सरकारांना तीन लाख रुपयांच्या औषधांची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून आतापर्यंत १.८० लाख रुपयांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्राकडून सल्लागारांची नियुक्ती पर्याप्तपणे केली गेली असून गरज पडल्यास अजून काही सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या उपायायोजना
’ केंद्र सरकारने अत्यावश्यक उपाययोजना हाती घेताना आरोग्य सेवा अधिक सक्षम करताना एच१एन१ विकारोन बाधित रुग्णांवर उपचार आणि आवश्यक चाचणी केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे.
’ बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट आणि ‘एन ९५’ मास्कदेखील उपलब्ध केले जाणार आहेत.
’ एच१एन१वर गुणकारक ठरणाऱ्या ओसेल्तामिविर गोळ्यांची पर्याप्त स्वरूपात उपलब्धता केली गेली आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयांवर एच१एन१ बाधित रुग्णांसाठी पर्याप्त बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
’ स्वाइन फ्लूची बाधा झालेले रुग्ण आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशात आढळून आला आहे.