फेसबुक म्हटलं की सोशल मीडियाचा बादशहा…सोशल मीडियाच्या जगामध्ये ट्विटरपासून अगदी इंस्टाग्रामपर्यंत सर्वांनी अधिकाधीक युजर्सना आपल्याकडे खेचण्यासाठी भन्नाट कल्पना आणल्या आणि सर्वोतपरी प्रयत्न केले…पण लोकप्रियतेच्या बाबतीत फेसबुकला कोणीच आव्हान देऊ शकत नाही, असं चित्र काही वर्षांमध्ये तयार झालं असताना अचानक टिकटॉक नावाचं एक नवं माध्यम आलं. टिकटॉकची भारतीय बाजारात एंट्री झाल्यापासूनच हे अॅप तरुणांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आणि आता भारतात फेसबुक आणि टिकटॉकमध्ये जबरदस्त स्पर्धा पहायला मिळतेय.

एका अहवालानुसार, टिकटॉकमुळे फेसबुकला धक्का बसल्याचं स्पष्ट होत आहे. 2019 च्या पहिल्या तिमाहीत टिकटॉक हे अॅप 18.8 कोटी युजर्सनी डाउनलोड केलं आहे. यामध्ये भारताचा वाटा तब्बल 47 टक्के इतका आहे. याच तिमाहीत फेसबुकला फटका दिसल्याचं स्पष्ट दिसतंय. कारण, या कालावधीत 17.6 कोटी युजर्सनी फेसबुक डाउनलोड केलं , त्यात भारतातील युजर्सचा वाटा 21 टक्के आहे. आतापर्यंत 2018 वर्षाच्या अखेरपर्यंत फेसबुक हे सर्वाधिक डाउनलोड होणारे अॅप होते.

भारतात फेसबुकचे जवळपास 30 कोटी युजर्स आहेत. तर, टिकटॉकचा वापर करणाऱ्यांची संख्या आता 20 कोटीच्या घरात गेली आहे. भारतात 2020 पर्यंत जवळपास 67 टक्के इंटरनेट वापरकर्ते 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे असतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
‘आगामी काळात भारतातील 20 ते 40 कोटी नवे युजर्स पहिल वहिलं समाजमाध्यम म्हणून टिकटॉकचा वापर करणार आहेत. आपल्या जीवनातील खास क्षण ते आमच्या प्लॅटफॉर्मद्वारे मित्रांशी, कुटुंबियांशी आणि जगभरातील युजर्ससोबत शेअर करतील. त्यामुळे आगामी काळात भारत आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ ठरणार आहे’, असं टिकटॉकद्वारे इकॉनॉमिक टाइम्सला केलेल्या इमेलमध्ये म्हटलं आहे.

मात्र, इतक्यात काही टिकटॉक फेसबुकला मागे टाकू शकत नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे हे अॅप फक्त छोट्या व्हिडिओंसाठी मर्यादीत आहे. पण जाहीर झालेल्या या नव्या आकडेवारीमुळे फेसबुकची चिंता वाढली असेल हे नक्कीच. यात फेसबुकसाठी एकच दिलासादायक गोष्ट म्हणजे फेसबुकचा वापर डेस्कटॉपवरही केला जातो.

‘टिकटॉक’ आहे तरी काय?
‘टिकटॉक’ या अॅपवरून युजर छोटे-छोटे (पंधरा सेकंदांपर्यंतचे) व्हिडियो तयार करून शेअर करू शकतात. या अॅप्लिकेशनचे कॉपी राईट ‘बाईट डान्स’ या चीनी कंपनीकडे आहे. या कंपनीने सप्टेंबर 2016 मध्ये ‘टिकटॉक’ अॅप लॉन्च केलं. 2018साली या अॅपची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि ऑक्टोबर 2018 मध्ये अमेरिकेत ते सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप ठरले.