देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आयपीएलची सर्वच आतुरतेने वाट पाहात आहेत. आयपीएलच्या याच लोकप्रियतेचा फायदा उचलण्याची तयारी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने केली आहे. रिलायन्स जिओने आपल्या चाहत्यांसाठी लाइव्ह मोबाइल गेम ‘जिओ क्रिकेट प्ले अलाँग’ची (Jio Cricket Play Along) घोषणा केली आहे. या माध्यमातून भरमसाठ बक्षिसे आणि कोट्यवधी रूपये जिंकण्याची संधी आहे.

जिओ क्रिकेट प्ले अलाँग देशातील सर्व स्मार्टफोन युजर्स खेळू शकतील. हा खेळ 11 भारतीय भाषेत खेळला जाऊ शकेल. आयपीएल दरम्यान जिओ क्रिकेट प्ले अलाँग या गेम अंतर्गत 60 मॅच खेळल्या जातील. क्रिकेटप्रेमींना हा गेम खेळण्याचा आनंद मिळेलच याशिवाय त्यांना भरमसाठ बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विजेत्यांना मुंबईमध्ये घर आणि 25 कार मिळण्याची संधी आहे. याशिवाय विजेत्यांना कोट्यवधी रुपये रोख जिंकण्याचीही संधी आहे. त्याचबरोबर जिओ सात एप्रिलपासून आपल्या माय जिओ अॅपवर ‘धन धना धन लाइव्ह’ कार्यक्रमाची सुरूवातही करणार आहे. हा कार्यक्रम माय जिओ अॅपवर एक्सक्लुजिवली दाखवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिओ आणि बिगर जिओ ग्राहकांसाठीही पूर्णपणे मोफत असेल. प्रसिद्ध विनोदी कलाकार सुनील ग्रोव्हर आणि क्रीडा सूत्रसंचालक समीर कोच या कार्यक्रमाचे संचलन करतील. तसंच जिओने एक क्रिकेट सीझन पॅक आणला आहे. यामध्ये ग्राहक आपल्या मोबाइलवर लाइव्ह सामना पाहू शकेल. या 51 दिवसांच्या पॅकमध्ये सर्वच सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीम करता येऊ शकेल. या पॅकमध्ये 251 रूपयांत 102 जीबी डेटा दिला जाईल.