पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचत योजना (एनएससी) या अनेक भारतीयांसाठी लोकप्रिय अशा गुंतवणूक योजना आहेत. या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो आणि सुरक्षिततेची खात्रीही असते. याशिवाय, या दोन्ही योजनांमधून मिळणारे उत्त्पन्न ८०-सी अंतर्गत करमुक्त असते.

या दोन्ही योजना फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत. एनएससी आणि पीपीएफसारख्या लघु बचत योजनांमध्ये एनआरआय गुंतवणूक करू शकत नाहीत. पण भारतीय नागरिक असताना या योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील आणि नंतर खातेधारक एनआरआय झाला तर शासनाकडून त्यांना सूट दिली जात असे. मात्र, आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काय आहेत हे बदल पाहूया…

हे आहेत आधीचे नियम

एनआरआयसाठी पीपीएफ: एनआरआय लोक पीपीएफ खाते उघडू शकत नाहीत. पण, खाते उघडल्यानंतर जर निवासी भारतीय एनआरआय झाला, तर खाते सुरू राहून योजनेची मुदत संपल्यानंतर त्याचा फायदा मिळू शकेल.

एनआरआयसाठी एनएससी: एनआरआय लोक एनएससीमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. पण, ती केल्यावर जर निवासी भारतीय एनआरआय झाला, तर योजनेची मुदत संपल्यानंतर त्याचा फायदा मिळू शकेल, पण तो पैसा त्यांना भारताबाहेर नेता येणार नाही. आता एनआरआयसाठी एनएससी आणि पीपीएफच्या नियमांत बदल झाल्यामुळे जुने नियम आणि नवे नियम यांत बरीच तफावत झालेली आहे.

काय आहेत नवीन नियम

एनआरआयसाठी पीपीएफ: नवीन अधिसूचनेप्रमाणे ‘जर या योजनेत एखाद्या निवासीने खाते उघडले असेल आणि नंतर खाते सुरू असताना ते अनिवासी भारतीय झाले, तर त्यांच्या अनिवासी होण्याच्या तारखेपासून खाते बंद झाले असे समजण्यात येईल.

एनआरआयसाठी एनएससी: नव्या नियमांप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केलेल्या व्यक्तीला एनआरआयचा दर्जा मिळेल, त्या तारखेला संबंधित खाते गोठवले जाईल.

व्याजाचा हिशेब काय?

अधिसूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे, एनआरआय व्यक्तींचे पीपीएफ आणि एनएससी खाते ज्या महिन्यात गोठवले जाईल त्या तारखेच्या अलीकडच्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे व्याज पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्याच्या दराप्रमाणे दिले जाईल.

आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार