चेरी ब्लॉसम अर्थात जपानी भाषेत ‘सकूरा’. जपानच्या कविता, कथा, चित्रपट, संगीत यातून पावलो पावली सकूराचे अत्यंत सुंदर वर्णन आढळते. जपानच्या सुंदरतेचे वर्णन सकूराविना पूर्ण होऊच शकत नाही. नाजूक गुलाबी, पांढ-या फुलांनी बहरलेली सकूराची झाडं, पारंपारिक किमोनो घालून आलेल्या सुंदर जपानी तरूणी, संगीत जणू आपण चित्रांच्या दुनियेत आलोय असा भास येथे आलेल्या कोणालाही झाल्याशिवाय राहणार नाही.
जपानमधले कावझे हे शहर तर खास चेरी ब्लॉसमसाठी प्रसिद्ध आहे. टोकियोपासून काही तासांवर असलेल्या या शहरातील चेरीच्या वृक्षांना फेब्रुवारी महिन्यात बहर येतो. हा बहर पाहण्यासाठी जपानी लोकच नाही तर जगभरातून पर्यटक येतात. खास चेरी ब्लॉसम फेस्टीव्हल येथे भरतो. मऊ रेशमाच्या कपड्यावर नाजूक जरीचे काम केलेले किमोनो, हातात तितकीच नाजूक छत्री आणि पंखा घेऊन आलेल्या जपानी तरूणी, कुठे पर्यटकांचे मनोरंजन करणा-या गेशा, सुटाबुटातले जपानी पुरूष या घोळख्यात वेगळे दिसणारे पर्यटक यांनी सारा परिसर फुलून जातो. जिथे तिथे सकुराची गुलाबी चादर पसरली असते आणि अशा भुरळ घालणा-या वातावरणात प्रेम झाले नाही तर नवलंच म्हणावे लागेल.
जपानी संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवणारा असा हा सोहळा असतो, पारंपारिक संगीताचे कार्यक्रम, टी हाऊसमध्ये टी पार्टी यांनी हा परिसर भरलेला असतो. चेरी ब्लॉसम हा फक्त काही आठवड्याचा असतो. कावझे शहर त्यासाठी प्रसिद्ध आहे. रस्त्याच्या दुर्तफा गुलाबी फुलांनी बहरलेली ही झाडे पाहताना डोळ्याचे पारणं फिटतं. या परिसरात चेरीची जवळपास ८ हजारांहून अधिक झाडं आहेत. जपानी लोक नेहमी म्हणतात आयुष्य हे सकूराच्या फुलांसारखे असावे. या फुलांचे आयुष्य ते काय? फक्त दोन आठवड्याचे. पण या दोन आठड्यात दुस-यांच्या चेह-यावर आनंद ती फुलवतात. आता ही फुलं बघायला आपल्याला तिथे जायला मिळले तेव्हा मिळेल पण फोटोमधून मात्र आपण नक्कीच या सुंदर गुलाबी फुलांचा आनंद घेऊ शकतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2017 12:05 pm