अमेरिकेतील पेन्सिल्व्हानिया स्टेट विद्यापीठाचे संशोधन

च्युईंग गम चघळणाऱ्यांसांठी एक सुवार्ता आहे. यातून शरीराला काही जीवनसत्त्वे मिळू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे. जीवनसत्त्वांअभावी होणाऱ्या रोगांना जगभरात आळा घालण्यासाठी या सवयीचा उपयोग होऊ शकतो, असे त्यांनी सुचवले आहे. च्युईंग गममधून होणाऱ्या जीवनसत्त्वांच्या पुरवठय़ाबाबत संशोधकांनी प्रथमच इतका सखोल अभ्यास केला आहे.

अमेरिकेतील पेन्सिल्व्हानिया स्टेट विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. जोशुआ लॅम्बर्ट याबाबत म्हणाले की, बाजारात मोठय़ा प्रमाणात गमची उत्पादने उपलब्ध असतानाही कोणीही याप्रकारचे संशोधन आतापर्यंत केले नाही याचे मला आश्चर्य वाटते. पण हे पदार्थ पूरक अन्न या वर्गवारीत मोडत असल्याने त्यांच्या उपयुक्ततेची चाचणी घेण्याची गरज नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

सप्लिमेंटेड गममधून तो चघळणाऱ्याला जीवनसत्त्वांचा पुरवठा होतो का, हे पाहण्यासाठी १५ जणांवर प्रयोग करण्यात आला. त्यांनी तो चघळल्यानंतर त्यांच्या लाळेतील आठ जीवनसत्त्वांचे प्रमाण तपासण्यात आले. त्याच वेळी वेगळ्या प्रयोगात त्यांच्या रक्तघटकांतील सात जीवनसत्त्वांचे प्रमाण तपासण्यात आले. या प्रयोगात सहभागी झालेल्यांच्या लाळेत जीवनसत्त्व अ १, ब १, ब २, ब ३,  ब ६, ब १२, क आणि ई चे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. त्यांच्या रक्तात जलविद्राव्य ब ६ व क जीवनसत्त्वाचे प्रमाणही वाढले होते. पूरक जीवनसत्त्वे नसलेल्या गमच्या तुलनेत हे प्रमाण जास्त होते.

चरबीत विद्राव्य जीवनसत्त्वांतही वाढ

सप्लिमेंटेड गम चघळणाऱ्यांत रक्तातील चरबीत विरघळणाऱ्या जीवनसत्त्व अ पासून मिळणाऱ्या रेटिनॉल तसेच जीवनसत्त्व ई पासून मिळणाऱ्या अल्फाटोकोफेरॉलचे प्रमाण वाढले होते.