नागपूर : एक्युट इन्सेफलायटिस सिंड्रोम (एईएस) या आजाराचे रुग्ण राज्यात २०१६ ते २०१८ या तीन वर्षांच्या तुलनेत २०१९ या वर्षांत दुप्पटीने वाढले असून, मृत्युसंख्या ११ पटींनी वाढली आहे. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आले आहे.

या आजारात मेंदूत तीव्र स्वरूपाच्या तापाची लक्षणे आढळतात. वर्ष २०१६ मध्ये राज्यात एईएसचे २० रुग्ण आढळले. त्यातील चौघे दगावले. २०१७ मध्ये १ रुग्ण आढळला. त्याचाही मृत्यू झाला. २०१८ मध्ये ४८ रुग्णांपैकी एक दगावला. १ जानेवारी २०१९ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राज्यात या आजाराचे ११२ रुग्ण आढळले. त्यातील उपचारादरम्यान ११ मृत्यू नोंदवले गेले. राज्यात १ जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत हिवतापाचे ५९ हजार ६२८ रुग्ण आढळले. त्यातील ६४ जण दगावले. या कालावधीत डेंग्यूचे ३५ हजार ५५८ रुग्ण आढळले असून पैकी १८० मृत्यू झाले. चिकनगुनियाचे ६ हजार ४९९ रुग्ण तर चंडिपुराचे केवळ सात रुग्ण आढळले. जपानी मेंदूज्वरचे ८१ रुग्ण आढळले. त्यातील ११ जणांचा मृत्यू झाल्याचेही सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीतून पुढे आले आहे.

अनुदानाच्या तुलनेत निम्माच खर्च

आरोग्य विभागाला हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम, एन्टी प्लेग ऑर्गनायझेशन, हिवताप नियंत्रण कार्यक्रम (राज्य क्षेत्र), मलेरिया प्रोग्राम (स्थानिक क्षेत्र) या संस्थेकडून विविध आजार नियंत्रणासाठी अनुदान मिळते. त्यानुसार, या संस्थांकडून १ एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०१९ दरम्यान ३२ लाख ५९ हजार २४८ रुपयांचे अनुदान मिळाले. पैकी १५ लाख १० हजार १४२ रुपयेच खर्च झाले. २०१६- १७ या आर्थिक वर्षांत राज्याला ३८ लाख २४ हजार ७३१ रुपयांचे अनुदान मिळाले. त्यातील ३६ लाख ३८ हजार ९६१ रुपये खर्च झाले. २०१७- १८ या वर्षांत ४० लाख ४३१ रुपयांचे अनुदान मिळाले. त्यातील ३९ लाख ६५ हजार ६९१ रुपये खर्च झाले. २०१८- १९ या वर्षांत ४२ लाख ६८ हजार ५८ रुपयांचे अनुदान मिळाले. त्यातील ४१ लाख ८६ हजार ४४४ रुपये खर्च झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.