-डॉ. तुषार पारेख

सद्यस्थितीत सर्वच वयोगटांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढत चालला आहे. त्यातच सध्या लॉकडाउनचा काळ सुरु असल्यामुळे या काळात मुलांना घरबसल्या डिजिटल शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र या उपकरणांमधून बाहेर पडणारा निळा प्रकाश हा डोळ्यांसाठी घातक असून लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचं पाहायला मिळतं. या निळ्या प्रकाशामुळे पेशी निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होत असून अनेकांमध्ये दृष्टीदोष निर्माण होतो. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून बाहेर पडणा-या निळ्या प्रकाशामुळे डोळ्याची बाहुली आणि डोळ्यातील भिंग यावर विपरीत परिणाम होतो.

डोळा हा सर्वात नाजूक अवयव असून इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अतिवापराचा परिणाम अनेकांच्या डोळ्यावर होऊ लागला आहे. लहान वयातच अनेक मुलांवर चष्मा वापरण्याची वेळ आली आहे. वाढत्य़ा स्क्रीनटाईममुळे हा सारा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. यात डोळ्यांची उघडझाप न झाल्याने डोळ्यांचा कोरडेपणा वाढतो आहे. डोळ्यातील ‘टिअर फिल्म’ ब्रेक होऊन डोळे कोरडे होऊ लागतात. त्यामुळे डोळ्यातील नसांना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्याचा परिणाम म्हणजे डोळ्यांना कमी दिसणे सुरू होते. डोळ्याच्या मागील भागात रेटिना असतो. त्याचा संबंध थेट मेंदूशी असतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे थेट रेटिनावर परिणाम होऊन मेंदूमधील डोळ्याच्या केंद्रावर परिणाम होताना दिसत आहे.

निरोगी डोळ्यांकरिता खालील उपायांचा अवलंब करा

१. लॉकडाउनच्या कालावधीत ऑनलाइन शिक्षण घेत असाल तर २०-२०-२०चा फॉर्म्युला वापरणे. त्यानुसार ऑनलाइन शिक्षण घेताना सलग २ मिनिटे घ्यावे, त्यानंतर ब्रेक घ्यावा डोळ्यापासून इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचे अंतर २० इंच असावे.

२. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून डोळ्यांचे अंतर योग्य न राखल्यास मुलांच्या डोळ्यावर ताण येतो. परिणामी, लहान वयातच मुलांना जाड भिंगाचा चष्मा वापरावा लागतो. तसंच दीर्घकाळ डोळे कोरडे राहतात. त्यामुळे या उपकरणांचा वापर करताना विशिष्ट अंतर राखा.

३. स्क्रीन टाईम कमी करा-
मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी त्यांना इतर गोष्टींमध्ये गुंतवा. नवनवीन गोष्टी, व्यायाम करण्यास सांगा.

४. झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी कोणत्याही गॅजेट्सचा वापर करून नका.

५. वेळोवेळी मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

६. मुलांना संतुलित आहार द्यावा. ज्यामध्ये भाज्या, फळे, सुकामेवा आदींचा समावेश असेल.

लेखक डॉ. तुषार पारेख हे पुण्यातील मदरहुड हॉस्पिटलमध्ये कन्‍सल्‍टंट निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञ आहेत)