शीतपेय, सोडा, पिझ्झा, बिस्कीट या पदार्थामुळे लहान मुलांना यकृताच्या आजारांचा धोका मोठय़ा प्रमाणावर असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

या पदार्थामुळे शरीरात सेरम युरिक आम्ल तयार होत असून त्यामुळे यकृताच्या आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. युरिक आम्लामुळे अल्कोहोल न घेताही यकृताचे गंभीर आजार होऊ शकतात. यालाच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिस असे (एनएएफएलडी) म्हणतात, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

विकसनशील देशांमध्ये काही प्रमाणात मद्य पिणारे किंवा शीतपेय घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्याचा परिणाम थेट यकृतावर होत असून यकृताच्या पेशींवर सूज येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिमी देशांतील ३० टक्के लोकसंख्येला यकृतासंबंधी आजार आहेत. त्यात ९.६ टक्के लहान मुलांना यकृताचा आजार आहे, तर ३८ टक्के लठ्ठ मुलांना यकृताचे गंभार आजार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्रिटन आणि इटलीतील संशोधकांनी २७१ लठ्ठ मुलांचा आणि मद्यपान न घेणाऱ्या मात्र यकृताला अपायकारक ठरणारे पदार्थ सेवन करणाऱ्यांचा अभ्यास केला. त्यांच्या दिवसभराच्या आहाराचा अभ्यास करून हे संशोधन मांडण्यात आले आहे.