१. अगदी लहान पणापासूनच मुलांच्या खाण्यात अतिरेकी गोड पदार्थ नकोत.

२. साखर, तूप, मैदा वापरून केलेल्या गोड पदार्थांमुळे नको इतक्या कॅलरीज जातात, त्यामुळे शरीरात मेद वाढून मुलांचं वजन अतिरिक्त वाढू शकतं. Fat cells म्हणजेच मेद पेशींची संख्या बालपणातच ठरते, तेव्हा वाढलेलं वजन कमी करणं नंतर अवघड असतं.

३. अशा पदार्थांमधून बरेचदा व्हिटामिन्स, मिनरल्स, शरीराला आवश्यक असणारी अमिनो असिड्स मिळत नाहीत.

४. अति गोड पदार्थांच्या पचनासाठी शरीरात इन्शुलीन जास्ती प्रमाणात तयार होतं. त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात.

५. गोड पदार्थांनी पोट भरले की इतर आवश्यक पदार्थ खाल्ले जात नाहीत.

६. गोड पदार्थाचे कण दातात अडकून नंतर अांबतात, त्यांचं लॅक्टीक अॅसिडमध्ये रुपांतर होतं आणि दात किडतात. म्हणूनच मुलांनी गोड पदार्थ खाल्यावर त्यांना व्यवस्थित दात घासून चुळा भरायची सवय लावा.
खाऊ म्हणून मुलांना कॅडबरी, गोळ्या, चॉकलेट देऊ नका. केक्स, पेस्ट्रीज वरचेवर खायची सवय नको.

७. पदार्थांना गोडी येण्यासाठी साखरे ऐवजी गूळ, मध, गुळाचा चुरा, काकवी वापरा.

८. गोड फळं – आंबा, केळं, पपई सुद्धा गोडीसाठी वापरू शकता. खजूर, बेदाणे, खारीक, सुकं अंजीर वापरून गोड बनवलं तर पोषकता वाढेल.

९. दाणे/ खोबरं/ काजू चिक्की, राजगिरा वडी, खजूर लाडू, पौष्टिक लाडू, अळीवाचे लाडू किंवा दाण्याच्या कुटाचा लाडू असे नरिशिंग गोड पदार्थ मात्र मुलांना आवर्जून द्या.

Recipe : Ragi Soya Chocolate

साहित्य : नाचणीचे पीठ- १ वाटी, सोया पीठ- २ चमचे, दुधाची साय किंवा क्रीम- २ ते ३ चमचे, गूळ चिरून- अर्धी वाटी, साजूक तूप- ४ ते ५ चमचे, सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड ) – ३ ते ४ चमचे, चॉकलेट – ५ ते ६ थेंब.

कृती : पॅनमध्ये तुपावर नाचणी आणि सोया पीठ भाजून घ्या. त्यात साय किंवा क्रीम घालून एकजीव करा. दुसऱ्या पॅनमध्ये गूळ थोडा पातळ करून त्यात चॉकलेट इसेन्स घाला. दोन्ही मिश्रणे एकत्र करा. एका ट्रे किंवा ताटलीला तुपाचा हात लावून मिश्रण थापून घ्या. वरून सुकामेव्याचे काप लावून घ्या. चॉकलेट चौकोनी कापून घ्या.

 

सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ