अन्न, पाणी यांबरोबरच सध्या मोबाईल ही एक महत्त्वाची गरज झाली आहे. सर्व वयोगटातील लोकांमध्ये सध्या मोबाईलचे वेड वाढल्याचे दिसते. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी गेम खेळण्याचे व्यसन लागल्याने तर कधी आणखी काही कारणांनी मोबाईल सतत वापरणे ही सवय झाली आहे. अशा लोकांना मग टॉयलेटमध्येही मोबाईल नेण्याची सवय लागते. मात्र ही सवय जीवावर बेतू शकते. नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरुन ही बाब समोर आली आहे. चीनमधील बिजिंग येथे एक व्यक्ती दिर्घकाळ मोबाईलवर गेम खेळत टॉयलेटमध्ये बसला होता. काही वेळाने अचानक त्याचे मलाशय बाहेर आले. मलासोबत अशाप्रकारे एखादा अवयव बाहेर येणे हे खऱ्या अर्थाने धोक्याचे आहे.

घटनेनंतर या व्यक्तीला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या व्यक्तीला आधीपासून आरोग्याच्या समस्या असल्याने हे झाले होते. मात्र दिर्घकाळ कमोडवर बसून राहील्यानेही हा त्रास बळावल्याचे दक्षिण चीनमधील रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे चुकीच्या सवयी वेळीच बदलणे गरजेचे असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. सहसा वयस्कर स्त्रियांना काहीवेळा या समस्येला सामोरे जावे लागते. मात्र इतरांमध्येही ही समस्या उद्भवू शकते. शौच करताना जास्त जोर दिल्याने तसेच अन्य काही कारणांमुळे ही समस्या उद्भवत असल्याचे बोलले जाते. पण या समस्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

याबरोबरच टॉयलेटमध्ये सर्वाधिक जीवजंतू असतात. आपण मोबाईल घेऊन टॉयलेटमध्ये जातो तेव्हा हे जंतू मोबाईलवर चिकटतात. टॉयलेटमध्ये जाऊन आल्यानंतर आपण हात स्वच्छ धुतो पण मोबाईल स्वच्छ करणं विसरतो. त्यामुळे हे जंतू मोबाईलवरच चिकटून राहतात. हवेतील तसेच मोबाईलचे तापमान जंतूच्या वाढीसाठी पोषक असल्याने त्या जंतूंची वाढ होते. तेव्हा मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा मागील बाजूस ठराविक तापमान असल्यास या सूक्ष्म जंतूची वाढ होते. त्यामुळे शक्यतो मोबाईल टॉयलेटमध्ये नेणे टाळलेलेच बरे.