चीनमधील तरुणाईला सध्या त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळत नाहीये. ‘एक घर, एक मुल’ हा नियम येथील सरकारने 2016 मध्येच रद्द केला पण याच नियमामुळे येथील तरुणाईचे ‘लाइफ पार्टनर’ शोधण्यासाठी खूप वांदे झालेत. देशातील अविवाहित तरुणाईची संख्या कमी करण्यासाठी येथील सरकारने एक अनोखा उपाय शोधला आहे. अविवाहित तरुणाईला त्यांच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळावा व लग्न जुळावं यासाठी खास ट्रेन सेवा सुरू करण्यात आली आहे.

या खास ‘लव्ह ट्रेन’ला चीनमध्ये Y999 या नावानेही ओळखलं जातं. तरुणाईचं लग्न जुळावं यासाठी तीन वर्षांपूर्वीच ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ तीन वेळेस ही ट्रेन धावली असून प्रेमाच्या शोधात एकूण एक हजार अविवाहितांनी या ट्रेनमधून प्रवास केलाय. जवळपास अडीच दिवसांच्या प्रवासात आपला जोडीदार शोधण्याची संधी अविवाहितांकडे असते. या ट्रेनमधील प्रवासादरम्यान आयोजकांकडून काही खास प्रकारचे गेम्स आयोजित केले जातात. ट्रेनमधील तरुणाईची एकमेकांशी ओळख व्हावी किंवा त्यांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा माराव्यात अशाप्रकारचे हे गेम असतात.

चीनमधील ही लव्ह स्पेशल ट्रेन चोंगकिंग नॉर्स स्टेशन ते कियानजियांग स्टेशन दरम्यान धावते. काही दिवसांपूर्वीच ही ट्रेन पुन्हा प्रवासाला निघाली होती. या ट्रेनमधून प्रवास केलेल्यांपैकी आतापर्यंत 10 जोडप्यांचं सूत जुळलं अन् त्यांनी लग्नही केल्याची माहिती आहे. तर, अनेकजणांमध्ये जन्मभराची मैत्री झालीये. आयुष्यातील जोडीदाराचा शोध घेणे हेच ही ट्रेन सुरू करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. चीनमध्ये 1970 पासून लागू करण्यात आलेल्या एक अपत्याच्या धोरणामुळे देशातील मुला-मुलींचा दर विस्कटला आहे. हे धोरण येथील सरकारने 2016 मध्येच रद्द केलेय पण यामुळे तरुणाईला लग्नासाठी समस्या निर्माण झाल्यात, अनेकांना आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळत नाहीयेत.