गोड खाण्याचा मोह आवरू न शकणाऱ्यांसाठी एक आंनदाची वार्ता आहे. अमेरिकेतील संशोधकांच्या म्हणण्यानुसार, नियमितपणे चॉकलेटचे सेवन करण्याचा संबंध हा चांगल्या आकलनशक्तीशी जोडलेला आहे. चॉकलेटचे नियमित सेवन हे मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त असल्याचे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्राचीन काळापासूनच चॉकलेट आणि कोकोचे अंश असलेले पदार्थ यांचा आरोग्यविषयक विविध समस्यांशी जोडला गेला आहे. चॉकलेट खाणे चांगले नाही, अशी शिकवण लहानपणीच दिली जाते. पण मेंदूच्या विकासासाठी चॉकलेट उपुयक्त आहे. त्यामुळे आकलनशक्ती वाढते असे या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, अमेरिकेतील मैन विद्यापीठ आणि द लक्संबर्ग वैद्यकीय संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. २३ ते ९८ वयोगटातील विविध व्यक्तींची चाचणी घेऊन हे संशोधन करण्यात आले. त्यांचा आहार आणि आकलनशक्ती तपासण्यात आली.
सतत चॉकलेटचे सेवन करणाऱ्या व्यक्तींची आकलनशक्ती प्रभावी असल्याचे दिसून आले. या व्यक्तींची स्मरणशक्ती, कामासंबंधी अवलोकन, निरीक्षणशक्ती आणि बौद्धिक क्षमता तपासण्यात आली. चॉकलेटचे सेवन करणाऱ्यांच्या मेंदूचा विकास चांगला झाल्याचे आढळले. ‘जनरल अ‍ॅपेशिरेट’मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या वेळी फक्त कामाच्या स्मरणशक्तीविषयक अपवाद वगळता हृदय व स्नायूविषयक संख्याशास्त्रीय निंयत्रण, दैनंदिन जीवनशैली आणि आहारातील घटक यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे दिसून आले.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)