11 December 2018

News Flash

सीएफएस हा मेंदूतील बदलांमुळे होणारा रोग

असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

क्रोनिक फटिक सिंड्रोम किंवा गल्फ वॉर इलनेस या दोन शारीरिक व मानसिक ताणाशी निगडित रोग लक्षणसमूहांमध्ये मानसिक कारणे नसून मेंदूतील बदल कारणीभूत आहेत, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.

आतापर्यंत हे दोन्ही लक्षण समूह हे निव्वळ मानसिक समजले जात होते; पण ते मेंदूतील रेणूंच्या रचनेत होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतात असे आता दिसून आले आहे. या दोन्ही रोगांत झोप बिघडते, घसा धरतो, हातपाय व डोके दुखत राहते, व्यायामानंतर थकवा येतो, स्नायू सतत कसर लागल्याप्रमाणे दुखत राहतात, ताण जाणवतो तसेच बोधनशक्ती राहत नाही. नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात असे म्हटले आहे, की क्रोनिक फटिक डिसॉर्डर हा मानसिक आजार नाही, त्यात रुग्णाच्या विचारांचा व मानसिकतेचा काही संबंध नसतो. या आजारावर अद्याप उपाय सापडलेला नाही व त्याची कारणेही माहिती नाहीत, पण आता मेंदूतील रेणवीय फरकांमुळे हा रोग होत असल्याचे सूचित होत आहे. त्यामुळे अमेरिकेतील ८३६००० ते २५ लाख लोकांसाठी आशेचा किरण आहे. भारतातही याचे अनेक रुग्ण असून या रोगाचे निदान करणे अवघड असते. आखाती युद्धातून परतलेल्या १७५००० लोकांच्या अभ्यासातून असे निष्पन्न झाले, की मेंदूतील बदलांमुळे हा आजार होतो. जॉर्ज टाऊन विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. जेम्स एन बरानिक यांनी सांगितले, की या दोन्ही रोगांतील लोकांचा रक्तद्रव तपासला असता त्यात फरक दिसून आला. स्थिर सायकल चालवणे व इतर व्यायामातून यात फायदा होऊ शकतो. मेंदूचा एमआरआय केला असता रोगात मेंदूत होणारे बदल दिसून येतात. फिजिओथेरपीचाही यात उपयोग होतो. व्यायामानंतर प्रथिनांचे नियंत्रण करणाऱ्या मायक्रोआरएनएचे प्रमाण बदलते, त्यामुळे हा रोग होतो. या रोगांमध्ये मेंदूत होणारे बदल हे अल्झायमर, डिमेन्शिया व नराश्यापेक्षा वेगळे असतात.

First Published on November 15, 2017 1:25 am

Web Title: chronic fatigue syndrome brain disease