News Flash

जाणून घ्या कशी करावी आयुर्विमा प्रक्रिया पूर्ण…

योग्य आयुर्विमा पॉलिसी घेण्याबरोबरच तो मिळवणेही तितकेच महत्त्वाचे आहे, मात्र त्याबाबत पुरेशी माहिती घ्यायला हवी.

प्रतिनिधिक छायाचित्र

आपल्या कुटुंबातील सदस्याला गमावणे केव्हाही भावनिकदृष्ट्या अवघडच असते. अशा शोकाचे दुःख अनेक महिने किंवा वर्षे चालू शकते. मानसिकरित्या सावरण्यासाठी वेळ लागणार असला तरीही आर्थिक साह्याने कुटुंबाला सावरायला थोडी-फार मदत होते. त्यामुळे योग्य आयुर्विमा कव्हर निवडतानाच विमा मिळविण्यासाठी कंपनीची प्रक्रिया सोपी असणेही तेवढेच महत्वाचे आहे. योग्य वेळेत आयुर्विमा मिळणे आवश्यक असते, हे बहुतांशी कंपनीवर अवलंबून असले, तरीही पॉलिसीधारक तिला लवकर पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतात. ही विमा रक्कम मिळण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी होण्यासाठी पॉलिसीधारक काय करू शकतात.

मृत्यूचा दावा करणे

दावा फाइल करणे : पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर आश्रितांना विमा कंपनीला लेखी सूचना द्यावी लागते ज्यात पॉलिसी क्रमांक, विमा धारकाचे नाव, मृत्यूची तारीख, ठिकाण आणि कारण इत्यादी लिहावे लागतात. यासाठी एक सूचना फॉर्म असतो जो तुम्ही त्यांच्या शाखेतून किंवा वेबसाईटवरून मिळवू शकता.

संबंधित कागदपत्रे दाखल करणे: जेव्हा तुम्ही मृत्यूचा फॉर्म दाखल करता, तेव्हा त्यासोबत मृत्यू प्रमाण-पत्र, पॉलिसीधारकाचा वयाचा पुरावा, पॉलिसीचे दस्तऐवज आणि इतर संबंधित कागद-पत्रेही दाखल करावी लागतात. जर पॉलिसी घेतल्यानंतर तीन वर्षांच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला असेल, तर इतर काही कागदपत्रेही आवश्यक असतात. पॉलिसीधारक दवाखान्यात असताना वारल्यास दवाखान्याचे प्रमाणपत्र, नोकरीत असल्यास पॉलिसीधारकाच्या नियोजकाचे प्रमाणपत्र, हजर असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून अंत्यसंस्काराचे प्रमाणपत्र, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आजाराचा उल्लेख असेल असे डॉक्टरांचे प्रमाणपत्र अशी इतर कागदपत्रे विमा कंपनीला लागतात.

क्लेम पूर्ण करणे: आयआरडीएच्या नियमांप्रमाणे विमा धन दावा केल्याच्या तीस दिवसांच्या आत दिले पाहिजे. जर विमा कंपनीला कुठल्याही प्रकारचा तपास करावयाचा असेल, तर ही मुदत दावा केल्यानंतर सहा महिने असते.परिपक्वता दावेहे दावे तेव्हा केले जातात जेव्हा विमाधारक पॉलिसीची मुदत संपल्यानंतर जिवंत असतो आणि पॉलिसीमध्ये परिपक्वता लाभ मिळण्याची हमी असते. अशा परिस्थितीत दाव्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागते:

विमा कंपनी पॉलिसी डिस्चार्ज फॉर्म पाठवते: पॉलिसीच्या मॅच्युरिटी डेटच्या साधारण एक महिना आधी विमा कंपनी तुम्हाला पॉलिसी डिस्चार्ज फॉर्म पाठवू शकते.

हा फॉर्म आणि त्यासोबत मागितलेले दस्तऐवज दाखल करा: फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि विमा कंपनीला परत पाठवताना त्यासोबत त्यात सांगितलेली कागदपत्रे सुद्धा पाठवा. यात पॉलिसीचे मूळ दस्तऐवज, ओळखपत्राची प्रत आणि राहात्या पत्त्याचा पुरावा तसेच बँक खात्याची माहिती देणारा फॉर्म असू शकतात आणि ते मॅच्युरीटी डेटच्या किमान पाच ते सात दिवस आधी पाठवा.

तपासणी: ही सर्व कागदपत्रे मिळाल्यावर विमा कंपनी सर्व माहिती पडताळून पाहाते आणि सर्व कागद-पत्रे योग्य असल्यास परिपक्वता रक्कम दिली जाते.

राइडर दावे

आयुर्विमा पॉलिसींमध्ये अनेक राइडर असू शकतात, जसे अपघात राइडर, अपघाती अपंगत्व राइडर, क्रिटिकल इलनेस राइडर, प्रीमियम माफी राइडर आणि हॉस्पिटल कॅश राइडर. काही परिस्थितीत राइडरचे लाभ मृत्यू दाव्यासोबत दिले जातात, पण काही दाव्यांसाठी अधिक कागदपत्रे जसे तपास अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, दवाखान्याची आणि औषधांची बिले, दवाखान्याचे डिस्चार्ज कार्ड इत्यादीची गरज पडते. लक्षात ठेवा तुम्ही नसताना तुमच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत सहज मिळायला हवे त्यासाठी इकडे-तिकडे धावायला लागायला नको. खालील सूचनांकडे लक्ष द्या आणि तुमच्या कुटुंबीयांना सांगून ठेवा की अशा परिस्थितीत काय केले पाहिजे.

⦁ पॉलिसी घेताना दिलेले वयाचा पुरावा आणि वैद्यकीय इतिहास यासारखी कागदपत्रे अचूक आहेत याची खात्री करा.

⦁ प्रस्तावपत्रात सर्व माहिती अचूक भरा आणि पुढे गडबड नको म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रे सांभाळून ठेवा.

⦁ एकदा पॉलिसीचे कागद मिळाल्यावर सर्व तपशील तपासून घ्या. सर्व अटी व नियम वाचून काढा. जर पॉलिसी तुम्ही क्लेम केल्याप्रमाणे नसली तर १५-३०  दिवसांच्या फ्री-लुक कालावधीत परत पाठवून दिलेले सर्व पैसे परत मिळवू शकता. जर तुमचा वैयक्तिक तपशील चुकीचा असेल, तर विमा कंपनीला सूचना द्या आणि सुधारणा करून घ्या.

⦁ नंतरची कटकट कमी करण्यासाठी तुम्ही पॉलिसीचे प्रीमियम नियमित भरून तिला व्यवस्थित सुरू ठेवली पाहिजे. जर प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला एक महिन्यापेक्षा अधिक उशीर झाला, तर तुमची पॉलिसी रद्द (लॅप्स) होऊ शकते आणि त्यानंतर केलेला दावा अस्विकार केला जाऊ शकतो.

⦁ पॉलिसी घेतानाच तुम्हाला त्यावर एका व्यक्तीला नामनिर्देशित करावे लागते आणि तसे त्या व्यक्तीला सांगून ठेवायला हवे. जर नामनिर्देशन झालेले नसेल, तर दाव्याच्या वेळी कंपनी उत्तराधिकार प्रमाण-पत्राची मागणी करते ज्यात वेळ लागू शकतो. तुमच्या नामनिर्देशित व्यक्तींना पॉलिसीचा सर्व तपशील आणि गरजेच्या कागदपत्रांचा तपशील माहीत असायला हवा.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2018 4:06 pm

Web Title: claim settlement for life insurance important tips
Next Stories
1 जिओ देणार ११२ जीबी डेटा, तोही ५६ दिवसांच्या वैधतेसह
2 शरीराविषयीच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत? मग हे वाचाच
3 आतडय़ात योग्य जिवाणू असल्यास चरबी शोषण्यास मदत
Just Now!
X