हवामान बदलाचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होत असल्याचे सर्वानाच ठाऊक आहे, पण हृदयविकार असलेल्या रुग्णांवरही हवामान बदलाचा परिणाम होत असल्याचे पोलंडमधील शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. प्रदूषण व हवामान बदलामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढलेली आहे, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले.
पोलंडमधील सिसेलिया या औद्योगिक क्षेत्रात हा अभ्यास करण्यात आला. पोलंडमधील हा सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेला प्रदेश आहे. त्यामुळे तेथे प्रदूषणाच्या परिणामांचा अभ्यास करणे सोपे गेले, असे या संशोधकांच्या गटाचे प्रमुख अनेता सिस्लॅक यांनी सांगितले. हृदयविकार असलेल्या रुग्णांच्या तब्येतीवर हवामानातील बदलांचा कसा परिमाम होतो हे या शास्त्रज्ञांनी तपासले. २००६ ते २०१२ या काळात २,३८८ रुग्णांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला.
या वेळी वातावरणाचा दाब, हवेचे तापमान, वाऱ्याचा वेग, आद्र्रता, वातावरणातील प्रारणे याबरोबरच सल्फर डायऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड्स, कार्बन मोनॉक्साइड, ओझोन आणि अन्य प्रदूषणकारी कण आदी घटकांची नोंद घेण्यात आली, तर रुग्णांच्या बाबतीत हृदयाची रक्ताभिसरणाची क्रिया, हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण, तसेच अन्य घटकांचा विचार करण्यात आला. या वेळी असे दिसून आले की रुग्णांवर रक्तवाहिनीचा कमी झालेला अंतर्गत व्यास वाढवण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रिया स्वच्छ सूर्यप्रकाश व हवामान असलेल्या दिवशी जास्त यशस्वी ठरल्या. या दिवशी वाऱ्याचा वेगही कमी होता. तसेच हवेतील ओझोन, कार्बन मोनॉक्साइड व नायट्रिक ऑक्साइड्सचे प्रमाण कमी होते.
वातावरणाच्या शरीराच्या साधारण प्रकृतीवर वेगवेगळा परिणाम होतो हे आजवर ठाऊक होते. तसेच चांगल्या वातावरणात राहिल्याने मनाचीही प्रकृती उत्तम राहते हेही ज्ञात होते, पण त्याचा इतका खोलवर परिणाम होत असेल याची शास्त्रज्ञांना या निमित्ताने प्रथमच जाणीव झाली. मात्र या घटकांचा प्रकृतीवर नेमका कसा परिणाम होत असेल याचे स्पष्टीकरण देताना संशोधक सिस्लाक यांनी सांगितले की, कार्बन मोनॉक्साइडसारखे प्रदूषणकारी घटक रक्तातील हिमोग्लोबिनबरोबर बांधले जातात आणि त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उपचारांच्या यशस्वितेवर परिणाम होत असावा, असे त्यांनी सुचवले. मात्र हे निष्कर्ष पूर्णपणे सिद्ध होण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.