अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन

वातावरणातील बदलाचा परिणाम पृथ्वीवर आणि एकूण पर्यावरणावर होत आहेच, शिवाय त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत आहे. वातावरणातील बदलाच्या परिणामांमुळे मानवाची लैंगिक क्षमता कमी होत असल्याचा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. लैंगिक क्षमता घटल्याने अमेरिकेतील जन्मदर घटल्याचेही त्यांनी नमूद केले.
वातावरणातील बदलामुळे पृथ्वीवरील तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. डोकेदुखी, शारीरिक थकवा, शरीराचे बाह्य़ तापमान वाढणे यांचा परिणाम लैंगिक क्षमतेवरही होत आहे. उष्णतेत वाढ होत असल्याचाही हा परिणाम असल्याचे या शास्त्रज्ञांनी सांगितले.
अमेरिकेतील जन्मदर हा नेहमीच घटता असतो. त्याला विविध कारणे आहेत. संतती नियमन, कुटुंब नियोजन, महिलांचे व्यावसायाला अधिक महत्त्व देणे आदी कारणांमुळे जन्मदर घटत आहे. लोकसंख्येचा भस्मासुर रोखण्यासाठी ते योग्य आहे, पण वातावरणातील बदल, जागतिक तापमानवाढ यांमुळे मानवाची लैंगिक क्षमताच कमी होत चालली आहे. त्याचाही परिणाम जन्मदर घटण्यावर होत असल्याचे या विद्यापीठाचे अ‍ॅलन बॅरेका यांनी सांगितले.
उष्णता वाढत असल्याने त्याचा परिणाम लैंगिक क्षमतेवर होत आहे. त्यास पर्यावरणाचा होणारा ऱ्हास जबाबदार असल्याचे अ‍ॅलन सांगतात. मानवी नागरीकरण थांबवावे, असे मी अजिबात म्हणणार नाही. पण जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. अ‍ॅलन बॅरेका हे सध्या अमेरिकेतील ‘नॅशनल ब्युरो ऑफ इकोनॉमिक रिसर्च’चे सदस्य असून, त्यांच्या नेतृत्वाखालील पथक वातावरणातील बदलाचा अभ्यास करत आहे.
‘थंड हवामानात लैंगिक क्षमता वाढते. मात्र तापमानवाढ अधिक होत असल्याने लैंगिक क्षमता घटत आहे,’ असे अ‍ॅलन म्हणाले.