जगभरात मद्य सेवन करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय असणारी बिअर हे सर्वाधिक सेवन केले जाणारे मद्य आहे. मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणाऱ्या वातावरणांमधील बदलांमुळे बिअर ज्यापासून बनवली जाते त्या बार्लीच्या पिकाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगाचे झाले तर वातवरणातील बदलांमुळे भविष्यात जगभरामध्ये बिअरचा तुटवडा जाणवू शकतो असं अभ्यासकांच म्हणणं आहे.

बार्लीचे उत्पनावर दुष्काळ आणि उष्णतेमुळे मोठा परिणाम होतो. त्यामुळे उत्पन्न कमी होण्याची शक्यता वाढते. ब्रिटनमधील नेचर प्लॅण्ट्स या वैज्ञानिक जर्नलमधील एका संशोधनातील अहवालामध्ये बिअर तुटवड्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वातावरणातील बदलांमुळे बार्लीच्या उत्पानावर परिणाम होऊन जगभरामध्ये बिअरची कमतरता जाणवेल तसेच बिअरच्या किंमतीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भातील अहवालाचे सह लेखक असलेले डॅबो गुआन यांनी बिअरचा तुटवडा म्हणजे नक्की काय यासंदर्भात माहिती दिली. लोकांनी आत्ता जास्त बिअर प्यावी हा आमच्या या संशोधनाचा हेतू नाही असे स्पष्ट करतानाच आयुष्यातील अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर वातावरणातील बदलांचा परिणाम जाणवेल असा संदेश आम्हाला लोकांपर्यंत पोहचवायचा असल्याचे डॉब यांनी सांगितले. डॉब हे युनायटेड किंग्डममधील नॉर्विच येथील उत्तर अँगलिया विद्यापिठामध्ये वातावरण बदल आणि अर्थव्यवस्था या विषयावरील प्राध्यापक आहेत.

जर तुम्हाला बिअरचा तुटवडा येऊ नये असे वाटतं असेल तर आपल्याला वातावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आपल्या सर्वांना एकत्र येऊन वातावरणातील बदलांबद्दल धोरण आखून ते कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा असेही डॉब म्हणाले.