नव्याने विकसित करण्यात आलेल्या रक्तचाचणीमुळे हृदयविकाराच्या झटक्याचे अचूक आणि लवकर निदान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संशोधनामध्ये एका भारतीय वंशाच्या संशोधकाचा समावेश आहे.

किंग्स कॉलेज, लंडनच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. हृदयाच्या स्नायूतील पेशी मृत झाल्यानंतर या पेशी रक्तप्रवाहामध्ये कशा ओळखता येतील, याबाबत यामध्ये संशोधन करण्यात आले. हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीच्या रक्ताची चाचणी करून ट्रोपोनिनसारख्या बायोमार्करचे मोजमाप करता येते.

ट्रोपोनिन हे हृदय स्नायूतील प्रथिन असून, ते शरीराला इजा झाल्यानंतर स्रवले जाते. ज्या वेळी हृदयविकाराचा झटका येतो अथवा हृदयाच्या स्नायूमध्ये दाह होतो, त्या वेळी ते शोधण्यात मदत होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर संबंधित रक्तचाचणी केल्यामुळे ट्रोपोनिनला ओळखता येऊ शकते. तसेच यामुळे रुग्णाला किती धोका आहे, हे समजण्यास मदत होऊन डॉक्टरांना यावर तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे.

या अभ्यासासाठी सेंट थॉमस रुग्णालयातील चार हजार रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यातील जवळपास ४७ टक्के रुग्णांना धोका जाणवला. तसेच यातील अनेकांचे विस्तारित कालावधीसाठी निरीक्षण आणि पुढील रक्तचाचण्या करण्यात न आल्याचे संशोधकांना आढळून आले.

नवीन चाचणीमुळे हृदयविकाराचा झटका आल्यास आणि तो समजण्यास मदत होणार असून संवेदनशीलतेमध्ये सुधारणा तसेच झटका आल्यानंतर ट्रोपोनिनची वाढलेली पातळी समजणार आहे. त्यामुळे रुग्णावर तात्काळ उपचार करणे शक्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हे संशोधन ‘क्लिनिकल केमिस्ट्री’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.