अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलेलं ‘इन्व्हाइट ओन्ली सोशल ऑडिओ अ‍ॅप Clubhouse’ चा डेटा लीक झाल्याचा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. क्लबहाउसच्या 1.3 मिलियन म्हणजेच 13 लाख युजर्सचा डेटा लीक झाल्याचा दावा सायबर सिक्युरिटी कंपनी Cyber News ने आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. मात्र, हे वृत्त चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे, असं स्पष्टीकरण Clubhouse चे सीईओ पॉल डेव्हिडसन यांनी दिलं आहे.

‘हे वृत्त चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे…आमचा डेटा हॅक झालेला नाही’, असं म्हणत कंपनीने हे वृत्त फेटाळलं आहे. ‘रिपोर्टमध्ये जो डेटा हॅक केल्याचं सांगितलं जात आहे तो डेटा आधीपासूनच पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे’, असं डेव्हिडसन यांनी सांगितलं. तसेच, तो रिपोर्ट म्हणजे क्लिकबेट लेख आहे( जास्त क्लिक मिळवण्यासाठीचा लेख) असंही डेव्हिडसन म्हणाले. क्लबहाउसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारेही यावर प्रतिक्रिया दिली असून, ‘क्लबहाउस हॅक झालं नाही…संबंधित वृत्त खोटं आहे’ असं स्पष्ट केलं आहे.


सायबर न्यूजने आपल्या रिपोर्टमध्ये, Clubhouse युजर्सचा SQL डेटा बेस लीक झाल्याचा दावा केला होता. यामध्ये युजर आयडी, युजर नेम, नाव, ट्विटर आणि इन्स्टाग्राम हँडल यासोबतच फोलोअर्सचीही माहिती असून लीक झालेला डेटा ऑनलाइन हॅकर फोरमवरही अपलोड करण्यात आल्याचा दावा सायबर न्यूजने केला होता. यामुळे १३ लाख युजर्सचा डेटा लीक झाला आहे. मात्र यात युजरला आर्थिक नुकसान होऊ शकतं असा डेटा नाही असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं. लीक झालेल्या डेटामध्ये क्रेडिट कार्डबाबत वगैरे माहिती नाहीये, पण जी माहिती लीक झाली आहे त्याद्वारे युजरवर फिशिंग अटॅक होऊ शकतो असं  या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. मात्र, हॅकर्सनी क्लबहाउस अ‍ॅपवर हल्ला केलेला नाही किंवा डेटाही चोरी गेलेला नाही असं स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आलं आहे.

काय आहे Clubhouse :-
क्लबहाउस एक आवाजावर आधारित सोशल मीडिया अ‍ॅप आहे. या अ‍ॅप्लिकेशनचं वैशिष्ट्य म्हणजे हे ऑडिओ अ‍ॅप्लिकेशन आहे. क्लबहाऊसचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे अ‍ॅप इनव्हाइट बेस आहे. या अ‍ॅपमध्ये तुम्ही ‘रूम’मध्ये सहभागी होऊ शकतात. तिथे बातम्या, डिजिटल मार्केटिंग किंवा अन्य कोणत्याही विषयावर चर्चा करता येते. अगदी शेतकऱ्यांचं आंदोलन किंवा बिटकॉइनसारख्या विषयांवरही तिथे चर्चा होते. तुम्ही तिथे तुमचं मतही मांडू शकतात किंवा इतरांचे फक्त विचार ऐकायचे असतील तर तसाही पर्याय यामध्ये आहे. हे सामाजिक ऑडियो अ‍ॅप असून भारतात केवळ iPhone युजर्ससाठीच हे उपलब्ध आहे. मात्र आयफोन युजर्सनाही केवळ दुसऱ्या युजरकडून इन्व्हाइट आल्यानंतरच हे अ‍ॅप वापरता येतं. एक युजर फक्त दोन जणांनाच इन्व्हाइट करु शकतो. काही दिवसांपासून या अ‍ॅपबाबत इतकी चर्चा आहे की, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनीही हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे.