कोका-कोला इंडियानं आता देशी पेय श्रेणीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या डेअरी शीतपेय ब्रँड वियोअंतर्गत स्पाईस्ड बटरमिल्क अर्थात मसाला ताक बाजारात उपलब्ध केलं आहे. दरम्यान, यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्व्हेटिव किंवा रंग मिसळण्यात आले नसल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. १८० एमएलच्या छासच्या पॅकची किंमत १५ रूपये ठेवण्यात आली आहे. तर या श्रेणीत पूर्वीपासून असेलेल्या अमूलच्या मसाला ताकाची किंमत १० रूपये तर मदर डेअरीच्या १८० एमएल मसाला ताकाची किंमत १२ रूपये आहे.

मुख्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर वियोचं मसाला ताक विकत घेता येऊ शकणार आहे. हे ओडिशा, आंध्र प्रदेश, गोवा, महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये तसंच दिल्ली आणि चेन्नईमधील दुकानांमध्येही उपलब्ध असेल. “डेअरी उत्पादनासाठी आणि त्यांच्या वापरासाठी भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आजच्या ग्राहकांना फंक्शनल बेवरेजेस हवे आहेत आणि वियो मसाला ताक त्याअंतर्गतच आमचा प्रयत्न आहे, असं मत कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे विपणन उपाध्यक्ष विजय परशुरामन यांनी व्यक्त केलं.

२०१६ मध्ये वियोची सुरूवात

कोका कोला इंडियानं २०१६ मध्ये वियो हा ब्रॅन्ड बाजारात आणला होता. तसंच ग्राहकांना रेडी-टू-ड्रिंक, व्हॅल्यू-अॅडेड डेअरी बेवरेज उपलब्ध करून देणं हा यामागील हेतू होता. वियो मसाला ताकासह कोका कोलानं आपल्या सध्या उपलब्ध असलेल्या बेवरेजेसच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.