शाळांमध्ये कॉफी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय शुक्रवारी सरकारने जाहीर केल्याने आता दक्षिण कोरियातील विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत असेपर्यंत तरतरीत राहण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत.

कॅफिनचे प्रमाण अधिक असलेल्या पेयांवर २०१३ मध्येच बंदी घालण्यात आली होती. परंतु कॉफी व्हेण्डिंग यंत्र शिक्षकांसाठी अद्यापही उपलब्ध असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ होत आहे. मात्र आता शाळेच्या संकुलात विद्यार्थ्यांना कॅफिनचे अधिक प्रमाण असलेली पेये मिळण्याची शक्यता सरकारला धुडकावून लावावयाची आहे. परीक्षेसाठी जागरण करून अभ्यासाची तयारी करण्यासाठी कॅफिनचे सेवन न करण्याचा इशारा अन्न आणि औषध मंत्रालयाने दिला आहे.

सदर बंदीची १४ सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे, पूर्वप्राथमिक, माध्यमिक आणि हायस्कूलमध्ये कॉफीच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्यात येणार आहे. शाळेत बसविण्यात आलेली व्हेण्डिंग मशीन आणि कॅफेटेरियामधून कॉफी गायब होणार आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.

कॉफीच्या अतिसेवनामुळे मळमळ, निद्राविकार आणि हृदयाचे ठोके अनियमित होणे असे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा इशाराही मंत्रालयाने दिला आहे. कॉफीची आयात करण्यामध्ये दक्षिण कोरियाचा जगात सातवा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी दक्षिण कोरियातील नागरिकांनी सरासरी प्रत्येकी ५१२ कप कॉफी सेवन केल्याचे कोरिया इंटरनॅशनल ट्रेड असोसिएशनने म्हटले आहे.