News Flash

हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला का होतो आणि त्यावर उपाय काय?

सर्दी-खोकल्याचा त्रास का होतो व त्यावर नेमका उपाय काय हे जाणून घ्या

सर्दी खोकला

हिवाळ्याचा ऋतू आल्हाददायक असला तरी मुलांसाठी हा काळ म्हणजे हमखास सर्दी-खोकला. टीव्हीवरच्या जाहिरातीत सर्दी-खोकला घालवण्याचा रामबाण उपाय म्हणून साबणापासून आरोग्यदायी पेयापर्यंत सतराशे साठ उपाय दाखवण्यात येत असले, तरी छोटय़ांची सर्दी जाण्यासाठी त्यांचा फारसा उपयोग नाही. सर्दी-खोकल्याचा त्रास का होतो व त्यावर नेमका उपाय काय हे जाणून घेऊया..

सर्दी-खोकला का होतो?

ऋतू बदलताना तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे विषाणूवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते आणि त्यामुळे साहजिकच संसर्गाची शक्यताही वाढते. पण हिवाळा स्थिरावल्यावर जो सर्दी-खोकला होतो, त्यासाठी विषाणूसंसर्ग हे कारण सहसा नसते. हिवाळ्यात हवा थंड झाल्याने जमिनीलगतच्या हवेच्या थरात अनेक धूलिकण, परागकण अडकून बसतात. वैज्ञानिक परिभाषेत त्याला धूरके म्हणतात. धूर आणि धुके यांचे मिश्रण. अशा हवेत धुळीची घनता वाढलेली असते. या धूलिकणांच्या, प्रदूषक घटकांच्या अ‍ॅलर्जीमुळे लहान मुलांना या काळात सर्दी खोकला होतो.

लहान मुलांना पटकन सर्दी का होते?

वयानुसार श्वसननलिका, कानामधील नलिका यांची लांबी वाढत असते. साहजिकच लहान मुलांमध्ये नलिका लहान असतात. त्यामुळे त्यांना अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे त्यांची प्रतिकारक्षमताही कमी असते. अ‍ॅलर्जीमुळे नाकातील नलिकेला सूज येते. त्याला ऱ्हायनायटिस म्हणतात, तर श्वसननलिकेतील सूज येण्याला ब्रॉन्कायटिस म्हणतात. ऱ्हायनायटिसमुळे नाक गळायला सुरुवात होते, तर ब्रॉन्कायटिसमुळे कफ, खोकला वाढतो.

सर्दी-खोकला जास्त वेळ का टिकतो?

सर्दी हा काही आजार नाही. यामुळे मुलांच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही. सर्दी-खोकला दोन चार दिवसात बरा होतो. मात्र शाळा, मैदान येथे खूप सारी मुले एकाच वेळी बराच काळ एकमेकांच्या अगदी जवळून संपर्कात येत असतात. त्यामुळे संसर्ग लवकर पसरतो. एखादे मूल सर्दीतून बरे होत असेल तर त्याला इतर मुलांच्या सर्दीमुळे पुन्हा त्रास वाढतो. त्याचप्रमाणे बऱ्या झालेल्या मुलालाही पुन्हा सर्दी होण्याची शक्यता असते.

सर्दी वाढण्यासाठी आणखीही कारणे आहेत. मिल्कशेक, आइस्क्रीम, कोल्ड्रिंक मुलांना आवडते. त्यामुळे हे प्रकार मुले घटाघटा संपवतात. त्यामुळे घशाचे तापमान खाली येते आणि अ‍ॅलर्जीला पूरक वातावरण निर्माण होते. मोठी माणसे आइस्क्रीम वगैरे खाताना हळूहळू, तोंडात घोळवून खातात.

त्यामुळे या पदार्थाचे तापमान वाढते आणि घशाला फारसा त्रास होत नाही. आइस्क्रीम, मिल्कशेक यामध्ये घातलेल्या कृत्रिम रंगद्रव्याचीही मुलांना अ‍ॅलर्जी असू शकते.

उपाय :

थंड वाऱ्यांपासून संरक्षण करणे हा प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक उपाय आहे. नाक, कान, घसा या तीन ठिकाणी अ‍ॅलर्जी होत असते. त्यामुळे या तीनही अवयवांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी कानटोपी हा सर्वात चांगला मार्ग आहे. सकाळी बाइकवरून जाणाऱ्या मुलांनी तर कानटोपी अगदी न चुकता घालावी. एसी, पंख्याचाही अनेक मुलांचा त्रास होतो. त्यामुळे रात्री स्वेटर घालून झोपणे आवश्यक ठरते. स्वेटरचा कंटाळा येत असेल तर इनर/थर्मल घालावा.

द्रवपदार्थ वाढवा- सर्दी, कफ सुकला की अधिक त्रास होतो. थंडीमुळे तहान कमी लागते. त्यामुळे शरीरातील पाणी आधीच कमी झालेले असते. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर शरीरातील पाण्याचा तोल सांभाळणे गरजेचे आहे. सामान्य तापमानापेक्षा जास्त उष्ण असलेले पदार्थ म्हणजे कोमट पाणी, सूप मुलांना नियमित प्यायला द्यवे.

नाक चोंदल्यावर मुले सतत नाकात बोट घालतात व त्यामुळे जखमा होतात. सर्दी पातळ करण्यासाठी ड्रॉप घालता येतात तसेच कफ कमी करण्यासाठीही डॉक्टरांच्या सल्लय़ाने औषधे घेता येतात. मात्र प्रतिजैविकांचा (अ‍ॅण्टिबायोटिक्स) वापर टाळावा. सर्दी-खोकल्यासाठी लसही उपलब्ध आहेत. मात्र प्रभावी ठरण्यासाठी दरवर्षी लस घेणे आवश्यक आहे.

आराम सर्वात महत्त्वाचा. दोन्ही पालक काम करत असल्याने मुलांना शाळेत पाठवण्याकडे कल असतो. मात्र त्यामुळे इतरांना संसर्ग होण्यासोबतच तुमच्या मुलाचाही त्रास वाढतो, हे ध्यानात घ्या. मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे सर्दी बरी होण्यासाठी आराम महत्त्वाचा आहे. सर्दी-खोकला झाल्यावर शाळेला तीन-चार दिवस सुट्टी घेऊन मुलाला आराम करू द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 8:25 am

Web Title: cold and cough problem in winter scsg 91
Next Stories
1 थंडीमध्ये ‘या’ चार गोष्टी खाल्ल्याने होईल फायदा
2 थंडीमुळे फाटलेले ओठ आणि पायांच्या भेगांसाठी काय कराल?
3 जिओच्या ग्राहकांना झटका; मोबाईल सेवांचे दर वाढवण्याची कंपनीकडून घोषणा
Just Now!
X