02 March 2021

News Flash

सुरवंटाचं फुलपाखरू होताना…

११वीच्या पहिल्याच दिवशी अगदी सीरिअलमध्ये कामं करणाऱ्या मुलींसारख्या दिसणाऱ्या मुली वर्गात पाहिल्या.

मुंबईच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयाजवळच्या या सीसीडी नामक ‘पॉश’स्थळी ती पहिल्यांदाच उगवलेली.

पहिला दिवस
लीना दातार – response.lokprabha@expressindia.com

मुंबईच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयाजवळच्या या सीसीडी नामक ‘पॉश’स्थळी ती पहिल्यांदाच उगवलेली. कधी नव्हे ते पहिल्यांदाच बिचकत बिचकत पर्समधून काढलेली ५००ची कोरी करकरीत नोट आणि त्याच क्षणी बाबांचे दोन वर्षांपूर्वीचे कानांत घोळलेले शब्द. ‘हे ५०० रुपये देऊन ठेवतो आहे. पण शक्यतो खर्च करायचे नाहीत. तिथे खूप श्रीमंत मुलंमुली असतील. पण म्हणून तिथली हवा लागू द्यायची नाही.’ तिनेही शहाण्या मुलीसारखा बाबांचा शब्द न् शब्द पाळलेला.

या दोन वर्षांतली तिची ही खास मत्रीण मात्र फार श्रीमंत. ज्युनिअर कॉलेजची. हिचा पोळी-भाजीचा डबा तर ती मात्र रोज खायची कँटीनमध्ये. ११वीत पहिल्यांदा कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली तेव्हा दडपून गेलेला तिचा किरकोळ जीव आठवला तिला. ११वीच्या पहिल्याच दिवशी अगदी सीरिअलमध्ये कामं करणाऱ्या मुलींसारख्या दिसणाऱ्या मुली वर्गात पाहिल्या तेव्हा होतं नव्हतं ते सगळं अवसान गळून गेलेलं. आपला इथे कसा निभाव लागणार ही सततची भीती वाटलेली. घरी गेल्यावर मात्र एक रोजचं छापील उसनं हसू. चुकून बंक झालेल्या लेक्चरनंतरचं पॅनिक होणं आणि एरव्ही तोंडावर गोडगोड बोलणारे सगळेच कसे छान हा गोंडस गरसमज स्वत:पाशी बाळगून जगणं.

ज्युनिअर कॉलेजमधल्या दिवसांची आपल्यातल्या अनेकांची गोष्ट नक्कीच वेगवेगळी असणार. बहुतेकांची कॉलेजच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात निघून गेलेली दोन वर्ष इतर काही मोजक्या मंडळींना मात्र खूप फेमस करून गेलेली असतात. मग ते अगदी सुरुवातीपासूनच प्रचंड आत्मविश्वासाने नाटय़मंडळं, इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेणं असो की भर उन्हात एनसीसीची परेड आणि अनोळखी गावांत एनएसएस टीमसोबत जाणं असो.

अगदी कसलेही अनुभव न घेतलेल्या एखाद्याला किंवा एखादीलासुद्धा ही दोन र्वष काही ना काही तरी नक्कीच देऊन गेलेली असतात. मग, पुन्हा एक पुढचा टप्पा. सीनिअर कॉलेजचा पहिला दिवस. बारावीतले किती तरी गायब झालेले आणि पूर्वी कधी न पाहिलेले. अचानक वर्गात दिसणारे काही नवे चेहरे. याच महाविद्यालयात पुढची डिग्री घ्यायची आहे असं ठरलेल्यांची गोष्ट वेगळी आणि काही तरी वेगळं करायचं स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे नाइलाजास्तव तिथेच अ‍ॅडमिशन घ्यावी लागलेल्यांची गोष्ट वेगळी. याच कॉलेजमधून पदवीधर व्हायचं हे ज्यांचं ठरलेलं असतं त्यातल्या बहुतेकांच्यात पदवीसाठी शेवटच्या वर्षांला कुठला विषय घ्यायचा याची क्लॅरिटी आलेली नसते. मग पुढे स्कोप कशाला आहे आणि आपली आवड काय याचा साधारण अंदाज घेत विषय निवडलेले असतात. ते निवडून झाल्यावरही आपली निवड योग्य आहे का याबद्दल काहीशी धाकधूक मनात असतेच. पण, आता ही निवड निभावून न्यायची असते. बरंचसं डोक्यावरून गेलेलं तत्त्वज्ञानाचं पहिलं लेक्चर आणि त्याच दिवशी उडत्या पक्ष्याने कानात आणून सोडलेली वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन समारंभाची बातमी. समोर पडलेलं सायकॉलॉजीचं जाडजूड पुस्तक आणि ग्रुप्समध्ये बसलेली मंडळी बघून खुणावणारा कट्टा. त्याच वेळी एकटीने निवांत बसून जिथे कधी तरी कविता सुचली होती तो केवळ आपला असलेला कॅम्पसमधला कोपरा.

या पहिल्या दिवशी इतक्या गोष्टी झर्रकन डोळ्यांसमोरून निघून जातात की मनाने त्यातली नेमकी कुठली गोष्ट टिपलेली आहे याचा थांग लागत नाही. इंजिनीयिरग किंवा मेडिकलला जायचं ज्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं नसतं अशांनी नाइलाजाने बीएस्सीला घेतलेली अ‍ॅडमिशन थोडी अधिक मायूसी आणते. त्यामुळे पुढचं चित्र त्यांच्यासाठी इतरांपेक्षाही थोडं अधिक धुसर. सीनिअर कॉलेजचा पहिला दिवस हा ज्युनिअर आणि सीनियर कॉलेजच्या मधल्या शांततेत रमलेला असतो. पुलंनी त्यांच्या ‘दाद’ या ललितसंग्रहात ‘कोसला’ वाचल्यानंतर असा एक लेख लिहिलाय. त्यात त्यांनी एके ठिकाणी म्हटलंय.. ‘या ‘कोसल्या’ची आणखी एक पंचाईत आहे. माणसाचे वाचन (म्हणजे व्यासंग नव्हे) चांगले पाहिजे. शाळेत मोठय़ाने वाचायला शिकवतात तसे किंवा रेडियोवरचे बातमीपत्र वाचणारे वाचतात तसे नव्हे. ज्यांना वाक्यातला अंधार-उजेड नीट दिसतो, सम कुठे आहे, काल कुठे आहे ते कळते त्यांचे वाचन.’ पुलंच्या याच वाक्याचा सीनिअर कॉलेजच्या पहिल्या दिवसाबाबत विचार केला तर  देखणं चित्र डोळ्यांसमोर तरळतं.

सीनिऑरिटीच्या विभागातून सीनिअर कॉलेजच्या आयुष्याकडे पाहणाऱ्याला तो आता जिथे उभा आहे त्या दाराआडच्या त्याच्या भूतकाळाचा आणि उद्या तो जिथे असल त्या दारापल्याडच्या भविष्याचा ‘मध्य’ गवसला पाहिजे. त्याला त्याच्या या पहिल्या दिवसाचं उत्तम वाचन करता यायला हवं आणि त्यासाठी आजच्या मन:स्थितीला नाना छटांच्या अंधार उजेडाचं कोंदण हवं. कधी उघडय़ा आकाशाखाली रात्री एकटे निवांत बसले आहात? उजव्या बाजूला तारांगणासारखा दिव्यांचा लखलखाट आणि डाव्या बाजूला आकाशात नीट पाहिल्यावर लक्षात येणाऱ्या अंधाराच्या छटा आणि या सगळ्यात आपल्यासारखे अगणित जीव. उद्याची भ्रांत दडवून आजचा दिवस सार्थकी लावल्याचे नि:श्वास सोडत कट्टय़ावर रेललेले.

उद्याच्या खुल्या आभाळाच्या आणि कालच्या सागरी खोलीच्या मधे जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे असणारे आपण. आजच्या अस्थर्याचा आस्वाद असा टपरीवरच्या चहाच्या घोटासारखा तल्लीन होऊन घेता आला पाहिजे आपल्याला. मात्र, सीनिऑरिटीच्या विभागातून सीनिऑरिटीकडे पाहायच्या आयुष्याच्या टप्प्यावर जाणवलेल्या या भावनांना अद्याप शब्द लगडलेले नसतात. त्या नि:शब्दतेत या शब्दांपलीकडचं अधिक काही तरी असतं.. जे पुढे सापडत नाही आणि ते सापडलेलं नाही हे सांगणारे शब्द मात्र हाती येतात.
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:53 pm

Web Title: college first day lokprabha article
Next Stories
1 पावसाळ्यात ‘या’ आजारांपासून राहा सावध
2 झोपेच्या समस्यांमुळे महिलांना रक्तदाबाचा त्रास
3 ब्लॅक बॉक्स म्हणजे काय माहितीये?
Just Now!
X