थंडीचे दिवस सुरू झाले की, बाजारपेठ लोकरीच्या कपड्यांनी भरगच्च भरून जाते. त्यात महाविद्यालयांत कॉलेजियन्समध्ये फॅशनचा थंड वारा सुटतो. फॅशनसोबत बोचणाऱया थंडीपासून वाचण्यासाठी तितकीच काळजी घेण्याचाही प्रयत्न प्रत्येकजण करत असतो.
कॉलेजकट्टयावर लोकरीचे जॅकेट घातलेले महाविद्यालयीन तरूण-तरुणींचे घोळकेच्या घोळके सकाळच्यावेळी पहायला मिळतात. त्यामुळे इतरांपेक्षा आपले जॅकेट फॅशनेबल असावे, आपल्या जॅकेटमध्ये काहीतरी नवे असावे याच्या प्रयत्नात सर्वजण असतात. म्हणजेच ‘फॅशनच्या टशन’ची चुणूक कॉलेजियन्समध्ये दिसते. पण, यावेळी बाजारपेठांमध्ये लक्ष वेधून घेतले आहे रंगबेरंगी ‘सॉक्स’ने.
हो, थंडीत पायांची काळजी घेण्यासाठी फुल साईज सॉक्स वापरणे सोयीस्कर ठरते. सध्याच्या शॉर्ट साईज सॉक्सच्या जमान्यात फुल-साईज सॉक्स घालण्याची फॅशन कॉलेज तरुणींमध्ये दिसून आली. परंतु, हे फुल-साईझ सॉक्सही बाजारपेठेत तितक्याच नवीन ढंगाने, नवीन रंगाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे कॉलेज तरूणी या फुल-साईज रंगबेरंगी सॉक्सला पसंती देत आहेत. हे सॉक्स विविध रंगात, आकर्षक डिझाईन्समध्ये बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
इतकेच नव्हे, तर अशा फुल-साईज सॉक्स परिधान केलेल्या काही कॉलेज तरुणींनी यावेळी आम्ही या सॉक्सला मॅचिंग ठरेल असे जॅकेट खरेदी केले असल्याचे सांगितले. यावरून कॉलेजियन्सने यावेळी या फुल-साईज सॉक्समधून थंडीतल्या फॅशनचा नवा ट्रेंड निर्माण केलाय.