एखाद्या व्यक्तीशी सहानुभूतीपूर्ण वर्तन केल्यास किंवा कणवेने वागल्यास नैराश्यग्रस्त व्यक्तींना नैराश्यावर मात करण्यास मदत होते, असे नव्या संशोधनात दिसून आले आहे.

कॅनडातील यॉर्क विद्यापीठाच्या मायरियम मॉन्ग्रेन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी या विषयावर अभ्यास केला. त्यांनी वयाच्या साधारण तिशीत असलेल्या आणि कमी-अधिक प्रमाणात नैराश्याने ग्रस्त असलेल्या ६४० व्यक्तींना सहानुभूतीपूर्ण वर्तन करून त्याची ऑनलाइन नोंद करण्यास सांगितले. या नोंदींचे विश्लेषण करून त्यांनी निष्कर्ष काढले. त्यानुसार एखाद्या व्यक्तीशी कणवेने वागले तर नैराश्य कमी होण्यास मदत होते असे दिसून आले.

नैराश्यग्रस्त व्यक्तींचे अनेकदा समाजात फारसे कोणाशी पटत नाही आणि मतभेदांमुळे वाद होतात. त्यामुळे त्यांना समाजात नाकारले जाण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम नैराश्य वाढण्यात होतो. यावर मात करण्यासाठी त्यांना कोणाशी तरी सामंजस्याने, कणवेने वागण्यास सांगण्यात आले. तसे केल्याने त्यांच्यातील नैराश्य कमी झाले. समाधानाची भावना वाढीस लागली आणि आयुष्यातील एकंदर सकारात्मकता वाढली.

ज्या नैराश्यग्रस्त व्यक्तींचे सर्वाधिक मतभेद होतात त्यांना सहानुभूतीपूर्ण वागण्याचा सर्वाधिक फायदा होतो, असेही या संशोधनातून निष्पन्न झाले. मतभेद करणाऱ्या व्यक्तींमध्ये सामान्यत: अनुकंपा नसते. त्यांच्या अगदी जवळच्या नात्यांमध्येही त्याचा अभाव असतो. त्यामुळे त्यांचे संबंध तणावपूर्ण असतात. मात्र सहानुभूतीपूर्ण वागण्याने यात बदल होऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.