रिलायन्स जिओने आपला ‘फिचर फोन’ बाजारात दाखल केल्यानंतर जिओच्या स्पर्धक कंपन्याही ‘स्मार्टफोन’ लाँच करण्यासाठी सरसावल्या आहेत. जिओ फोनचे अतिशय कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात बुकींग झाले होते. नुकताच हा फोन ग्राहकांच्या हातात येण्यासही सुरुवात झाली आहे. हा फोन ग्राहकांना जवळपास मोफतच मिळत असल्याने इतर कंपन्यांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे अनेक नामांकित टेलिकॉम कंपन्यांनी आपले कमी किंमतीतील स्मार्टफोन बाजारात येणार असल्याचे जाहीर केले.

एअरटेल कंपनी आपला नवा फोन अवघ्या २ हजार रुपयांना उपलब्ध करणार आहे. विशेष म्हणजे हा फोन ४ जी असून तो पुढच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. याशिवाय आयडिया आणि वोडाफोन या टेलिकॉम क्षेत्रातील नामांकित कंपन्याही येत्या दोन ते तीन आठवड्यात आपले फिचर फोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. एअरटेल कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फोनबरोबरच कंपनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना अनोख्या ऑफर्स देणार आहे. व्हॉईस आणि डेटा दोन्हीसाठी हे पॅक्स अतिशय माफक दरात उपलब्ध असतील. एअरटेलचा हा फोन ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात बाजारात येईल.

मृत्यूनंतर आपल्या फेसबुक अकाऊंटचे काय होते माहितीये?

एअरटेलच्या नव्या फोनची वैशिष्ट्ये

१. टचस्क्रीन देण्यात आलेल्या या फोनचा डिस्प्ले ४ इंचाचा असेल
२. रॅम १ जीबी
३. ८ जीबी इंटरनल मेमरी
४. बॅटरी १६०० ते १८०० मिलीअॅम्पियर्स
५. फेसबुक आणि व्हॉटसअॅप ही अॅप्लिकेशन्स फोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल केलेली असतील.
६. भारती म्युझिक अँड मूव्ही अॅप्लिकेशन असेल

एकीकडे जिओच्या स्पर्धक कंपन्यांनी बाह्या सरसावल्या असताना जिओच्या फोनसाठी ६० लाख जणांनी बुकींग केले आहे. त्यांना हा फोन घरपोच फोन मिळण्यास सुरुवात झाली आहे. या फोनचा ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्रसार व्हावा यासाठी आधी ग्रामीण भागात या फोन्सची डिलिव्हरी केली जाणार आहे. त्यानंतर शहरी भागातील ग्राहकांसाठी हा फोन उपलब्ध होणार आहे. येत्या १५ दिवसांत बुकिंग झालेल्या सुमारे ६० लाख फोन्सची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. त्यांनतर पुढच्या टप्प्यातील बुकिंगला सुरुवात होणार आहे. याशिवाय जिओने आकर्षक असे डेटा प्लॅनही जाहीर केले आहेत. त्यामुळे जिओला टक्कर देण्यासाठी पुढच्या तीन ते पाच महिन्यात अनेक कंपन्या आपले नवे कमी किंमतीतील फोन बाजारात आणतील. या नव्या फोनची किंमत ३ ते ५ हजारांच्या दरम्यान असेल असे अभ्यासकांनी सांगितले आहे.

रक्तदात्यांनो, फेसबुकच्या नव्या फिचरबद्दल आवर्जून जाणून घ्या!