News Flash

फसवणुकीची ‘लिंक’

दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट. मी सदस्य असलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर एक मेसेज अवतरला. तो इंग्लिश मेसेज एका प्रख्यात कॅमेरा कंपनीच्या नावाने होता.

दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट. मी सदस्य असलेल्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर एक मेसेज अवतरला. तो इंग्लिश मेसेज एका प्रख्यात कॅमेरा कंपनीच्या नावाने होता. ‘अमुक अमुक कंपनीच्या नव्या कॅमेऱ्याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे’ असा मजकूर आणि त्यासोबत लिंक, असे त्या संदेशाचे स्वरूप होते. एका मित्राने बक्षिसाच्या आशेने त्या लिंकवर क्लिक करताच समोर खुल्या झालेल्या वेबपेजवर प्रश्नावली झळकली. त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर समोरील स्क्रीनवर कॅमेऱ्याचे चित्र झळकले. ‘तुम्ही हा कॅमेरा जिंकला आहात. अधिक माहितीसाठी ‘नेक्स्ट’वर क्लिक करा’ असा मजकूर वाचताच मित्राच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने ‘नेक्स्ट’वर क्लिक करताच त्याला विचारणा झाली. ‘कॅमेरा मिळवण्यासाठी तुमच्या परिचयाच्या २० जणांना ही लिंक पाठवा’.. आता मित्राचे डोळे खाडकन उघडले. ‘अच्छा, तर हा प्रकार आहे होय!’ म्हणत त्याने सरळ ते वेबपेज बंद करून टाकले..

तुम्हालाही व्हॉट्सअ‍ॅपवर दररोज असे अनेक संदेश मिळत असतील. ‘अ‍ॅमेझॉन कंपनीचे गिफ्ट व्हाउचर’, ‘जिओ कंपनीचा रिचार्ज’, ‘फ्लिपकार्टवरील आकर्षक बक्षिसे’, ‘रिबॉकचे बूट’ इतकंच काय ‘टोयोटाची कार’ देण्याचे आमिष दाखवून येणाऱ्या या संदेशांतील लिंकवर अनेकजण क्लिक करतात आणि सायबर गुन्हेगारांच्या गळाला लागतात. एखाद्या कंपनीची ‘अ‍ॅनिव्हर्सरी’ किंवा ‘स्टॉक एंडिंग’ किंवा आणखी काही कारणे सांगून व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अशा लिंक पसरवण्यात येतात. हे ‘फिशिंग’चे कारस्थान आहे. ‘फिशिंग’म्हणजे ईमेल, एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ‘लिंक’ पाठवून वापरकर्त्यांला आपल्या जाळ्यात ओढणे आणि त्याची व्यक्तिगत माहिती, आर्थिक तपशील मिळवणे. ‘फिशिंग’ हा प्रकार इंटरनेटइतकाच जुना आहे. पूर्वी ईमेलच्या माध्यमातून ‘तुम्ही एक कोटी डॉलरची लॉटरी जिंकला आहात’ किंवा ‘माझ्या मागे कुणी नसल्याने माझी संपत्ती तुमच्या नावावर करायची आहे’ असा संदेश आणि फसवणुकीची लिंक पाठवली जायची. कालांतराने मोबाइलच्या एसएमएसच्या माध्यमातूनही असे फसवणूक करणारे संदेश पाठवले जाऊ लागले. आता व्हॉट्सअ‍ॅप हे अशा लुबाडणुकीचे प्रमुख माध्यम बनले आहे. ‘अ‍ॅमेझॉनच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहकांना मोफत भेटवस्तू दिल्या जात आहेत. तुम्हीही लगेच या लिंकवर क्लिक करा’ असे सांगणारे संदेश तर दररोज कुठल्या न कुठल्या ग्रूपवर फिरत असतात. हा ‘फिशिंग’चाच प्रकार आहे.

‘फिशिंग’ नेमकं कशाचं?

अशा प्रकारचे संदेश पाठवण्यामागे अनेक हेतू असतात. अशा लिंकच्या माध्यमातून तुमची वैयक्तिक माहिती चोरी करण्यात येऊ शकते. तुम्ही एखाद्या लिंकवर क्लिक करताच त्या लिंकच्या माध्यमातून खुल्या होणाऱ्या वेबपेजमधून काही मालवेअर तुमच्या स्मार्टफोनमध्ये शिरकाव करून तुमची गोपनीय माहिती चोरी करू शकतात. या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. मुख्य म्हणजे, अशा प्रकारची नागरिकांची माहिती गोळा करून ती मोठमोठय़ा कंपन्यांना विकण्यात येते.

काही लिंक या थेट वापरकर्त्यांच्या डेबिट/ क्रेडिट कार्डाची माहिती लांबवण्यासाठी पाठवण्यात आलेल्या असतात. एखादे ‘गिफ्ट कार्ड’ जिंकल्याचा संदेश पाठवणाऱ्या या लिंक क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यांच्या डेबिट/क्रेडिट कार्डाचा तपशील विचारतात. वापरकर्तेही गिफ्ट कार्ड मिळवण्याच्या लोभाने ही माहिती देऊन टाकतात. सहाजिकच ही माहिती मिळवून वापरकर्त्यांच्या  आर्थिक खात्यांतील रक्कम लंपास करण्यात येते.

काही प्रकारच्या लिंक वापरकर्त्यांची ऑनलाइन माहिती मिळवण्यासाठी तयार करण्यात येतात. फेसबुक, ट्विटर किंवा अन्य समाजमाध्यमांवरील खात्यांची माहिती चोरून त्यावरून परस्पर भलतेच संदेश प्रसारित करण्यात येतात. यातून केवळ तो वापरकर्ताच नव्हे त्याच्या खात्यांशी जोडल्या गेलेल्या अन्य व्यक्तींची माहिती चोरी करण्याचेही प्रयत्न असतात. कित्येकदा वापरकर्त्यांच्या फेसबुक खात्यावरून त्याच्या मित्रांना संदेश पाठवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. आपला मित्रच पैसे मागतोय, असे समजून ते मित्र त्याला पैसे पाठवतात. मात्र, मागाहून त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

२०१८मधील एका सर्वेक्षणात पाहणी करण्यात आलेल्या सात लाख फिशिंग ईमेलमधील पन्नास टक्के मेल वापरकर्त्यांनी ‘ओपन’ केले तर जवळपास ३३ टक्के वापरकर्त्यांनी ‘ती’ लिंक क्लिकही केली.

मग काय करायचे?

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक किंवा एसएमएसवरून येणाऱ्या अशा फसवणुकीच्या लिंक आपण अनेकदा अनवधानाने, आमिषाने किंवा नकळतपणे क्लिक करतो आणि मग आपल्या लक्षात येते की आपण चूक केली. अशा वेळी मागे फिरण्याचा पर्याय नसतो. मग तुम्ही काय करू शकता?

 • खुल्या झालेल्या वेबपेजवर कोणताही तपशील नोंदवू नका.
 • तातडीने इंटरनेट खंडित करा.
 • तुमचा कॉम्प्युटर/स्मार्टफोनमध्ये अँटिव्हायरस स्कॅन करा.
 • तुमच्या ईमेल किंवा अन्य खात्यांचे पासवर्ड बदला.
 • तुमच्या कॉम्प्युटरमधील फायली बॅकअप घ्या.
 • कोणत्याही अशा लिंकवरील वेबपेजमध्ये डेबिट/ क्रेडिट कार्डचे तपशील भरू नका.

नेहमी सुरक्षित राहण्यासाठी..

 • तुमच्या संगणकांमधील सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा.
 • संगणकातील अँटीव्हायरस नेहमी अपडेट करा.
 • विविध खात्यांचे पासवर्ड नियमितपणे बदला.
 • नेहमी गुंतागुंतीचे पासवर्ड नोंदवा.
 • एकच पासवर्ड सर्व खात्यांसाठी ठेवू नका.
 • शक्यतो ‘टू फॅक्टर ऑथंटिकेशन’ पद्धतीचा अवलंब करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 2:35 am

Web Title: computer internet camera whatsapp lifestyle ssh 93
Next Stories
1 भारतीय राजकारण – राजकीय व्यवस्थेतील गतिमान मुद्दे
2 करिअर मंत्र
3 नोकरीची संधी
Just Now!
X