News Flash

मनोमनी : मी खूप ‘हर्ट’ झालोय!

वाईट वाटणं आणि भावनिकदृष्टय़ा दुखावले जाणं म्हणजेच ‘हर्ट’ होणं. या वेगवेगळ्या भावना आहेत.

डॉ.अमोल देशमुख

हर्ट होणे म्हणजेच मन दुखावले जाणे ही एक अस्वास्थ्यकारक नकारात्मक असह्य़ भावना आहे. वेळच तुटलेल्या अंत:करणाला सुधारते, महिने किंवा वर्षांनंतर मनाची जखम बरी होते असं म्हणतात. पण महिने की वर्षे का वाट पाहायची? आज त्यावर का काम करू नये?

वाईट वाटणं आणि भावनिकदृष्टय़ा दुखावले जाणं म्हणजेच ‘हर्ट’ होणं. या वेगवेगळ्या भावना आहेत. भावनांचा आणि वर्तनाचा बारकाईने अभ्यास केल्यावर हे लक्षात येतं. हर्ट होणे ही स्वयंघातकी भावना आहे. स्वत:ची छळवणूक करण्यास ही भावना पुरेसी आहे.

आपले मन दुखावले जाणे हा एक वेदनादायक अनुभव आहे. मन दुखावले जाणे याच्या तळाशी बरीच वैचारिक आणि भावनिक गुंतागुंत असते. ज्यामध्ये व्यक्तीला आपल्यास सोडले, नाकारले आणि विश्वासघात केल्याने राग येतो. आपण या नात्यासाठी पात्र नाही म्हणून दु:ख वाटते किंवा स्वत:चा तिरस्कार वाटतो कारण आपल्यात काही तरी चुकीचे आहे, असे वाटते. आपल्याला ही एक मोठी समस्या असल्यासारखे वाटत असले तरी प्रत्यक्षात त्या दोन समस्या आहेत. एक तर आपलं नातं संपुष्टात येते आणि दुसरं म्हणजे स्वत: दुखावले जातो.

जेव्हा आपण हर्ट होतो तेव्हा बरेचसे लोक ज्याने दुखावले किंवा हर्ट केले त्यासोबतचा संवाद थांबवतात. भावना दुखावलेली व्यक्ती कधी एका शब्दात समोरच्यास उत्तर देतो तर कधी कधी दुर्लक्ष करतो किंवा बरेचदा फक्त खाणाखुणा करून टाळाटाळ करीत असतो. अशा वागणुकीचा अर्थ फक्त दुसऱ्याला मी किती हर्ट झालो आहे हे दाखवून देणे हा असतो. या भावना आपल्याला आपल्या भावनिक, नातेसंबंधिक गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यास मदत करतात का? तर नक्कीच नाही. तर उलटपक्षी ही असह्य़ भावना आपल्याला त्या व्यक्तीपासून दूरवर घेऊन जाते. अबोल भाषेतून समोरच्या व्यक्तीला आपण का दुखावलो आहे हेही कळायला पाहिजे ही अवाजवी मागणी करतो. आपण जास्त तेव्हा दुखावलो जातो, जेव्हा आपण समोरच्याने माफी मागावी असा मनात अट्टहास करतो आणि तो तसे करण्यास असक्षम ठरतो. अशाने आपण स्वत:ला अजून दुखावत जातो.

यातून बाहेर पडण्याची गुरूकिल्ली म्हणजे आपल्या विचारांमध्ये बदल करून असह्य़ भावनांकडून (हर्ट/मन दुखावणे) सह्य़ भावनांकडे (वाईट वाटणे) जाणे आहे. असे करत असताना आपल्याला वास्तववादी, विवेकनिष्ठ विचारसरणी अंगीकारावी लागते, जी आपल्याला समाधानी ठेवून प्रोत्साहित करेल आणि आपल्या उद्दिष्टांकडे घेऊन जाईल.

अशा वेळी स्वत:च्या समस्येची, असह्य़ भावनांची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. आपण इतरांवर लादलेल्या मागण्या या अविवेकी आहेत हे मान्य करणे गरजेचे आहे. समोरचा व्यक्ती कधी कधी वेगळा वागू शकतो ही शक्यता लक्षात ठेवून समोरच्याने तसे करूच नये हा दुराग्रही हट्ट आपण करून काही बदलणार नाही. आपल्याला आपली प्राथमिकता ओळखून आपल्या इच्छा व गरजा इतरांकडे वेळोवेळी स्पष्टपणे व्यक्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी संवाद आवश्यक आहे. स्वत:चा, इतरांचा आणि परिस्थितीचा विनाशर्त स्वीकार करणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 12:01 am

Web Title: concept of mental pain emotional pain psychological pain zws 70
Next Stories
1 हृदयातील झडपा : विकार व उपचार
2 झुरळांपासून सुटका करुन घेण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा
3 स्वस्तात Poco X3 PRO खरेदी करण्याची आज संधी, जाणून घ्या सविस्तर
Just Now!
X