मातीतील एक घातक जिवाणू जो दरवर्षी जगातील ९०,००० लोकांचा जीव घेतो तो आपल्या शिंकेतून पसरून थेट मेंदू व मेरुरज्जूकडे २४ तासांत जाऊ शकतो, असे अभ्यासात दिसून आले आहे. या जिवाणूचे नाव आहे, बुर्खोलदेरिया सुडोमली. त्यामुळे मेलिओडिसिस हा ऑस्ट्रेलिया व आग्नेय आशियात आढळणारा रोग होतो.

ऑस्ट्रेलियात मेलिओडोसिस होण्याची शक्यता २०-५० टक्के आहे. त्याचा संसर्ग मेंदूला झाला तर माणूस मरण्याची शक्यता जास्त असते. आग्नेय आशियात २० ते ५० टक्के लोकांना मेलिओडोसिसची बाधा होते. कम्बोडियात या रोगाने मृत्यूचे प्रमाण ५० टक्के आहे. हा जिवाणू मेंदू व मेरुरज्जूपर्यंत कसा पोहोचतो हे समजलेले नाही.

ग्रिफीथ व बाँड विद्यापीठ या ऑस्ट्रेलियातील संस्थांनी साधा स्टॅफिलोकॉकल जिवाणू मेरुरज्जूपर्यंत कसा पोहोचतो हे शोधले. अल्झायमरच्या रुग्णात क्लामिदिया जिवाणू मेंदूत कसा पोहोचतो हे शोधले आहे. त्यातून हाडांना जिवाणूंची बाधा होणारी पाठदुखी व इतर आजारांवर उपाय शोधता येईल. त्यावर प्रतिजैविकांचे उपचार शक्य असतात. ग्रिफीथ विद्यापीठाचे जेम्स सेंट जॉन यांच्या मते हा जिवाणू तुम्हाला नकळत नाकाच्या खोबणीतून थेट मेंदूत व तेथून मेरुरज्जूत पोहोचतो. बाँड विद्यापीठातील जेनी एकबर्ग यांच्या मते हा जिवाणू ज्या वेगाने मेंदूत जातो ते भीतीदायक आहे.

त्यामुळे पाठदुखी होऊ शकते, ट्रायजेमिनल नव्‍‌र्हमधून तो पसरतो, असे सेंट जॉन यांचे म्हणणे आहे. नाकातील ओलफॅक्टरी म्युकोसा हा मेंदूच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे तेथूनच विषाणूही मेंदूत पोहोचतात, असे ऑस्ट्रेलियातील इन्स्टिटय़ूट ऑफ ग्लायकोमिक्सचे इफॉर बीचम यांचे म्हणणे आहे. जिवाणू त्याच मार्गाने पसरतात का हे अजून माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. ‘जर्नल इम्युनिटी अँड इन्फेक्शन’ या नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)