अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक विषयांवरील संभाषण टाळले जाते. पैसा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बाबतीत केंद्रस्थानी असायला नको असे तरी त्यावर चर्चा करणे गरजेचे असते कारण पैसा आयुष्याचा महत्वाचा घटक आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही कर्जबाजारी झालेला असलात, किंवा कुटुंबासाठी काही मोठे काम करण्यासाठी झटत असलात (उदा. घर खरेदी करणे), तर तुम्हाला त्याबद्दल कुटुंबातील सर्वांशी संवाद साधणे गरजेचे आहे. जरी तुमचा पोर्टफोलिओ तुमच्या जोडीदारापेक्षा वेगळा असेल तर सुदृढ आर्थिक जीवनासाठी तुम्ही त्याबद्दल स्पष्ट असले पाहिजे. जोडीदाराला तसेच घरातील इतरांना आपले आर्थिक उद्दिष्ट आणि जबाबदारी सांगितली पाहिजे आणि आपल्या मुलांना तुमचे ज्ञान आणि अनुभव दोन्हीचा फायदा करून दिला पाहिजे.
आज काही असे आर्थिक विषय पाहूया ज्यांवर कौटुंबिक चर्चा झालीच पाहिजे.

बजेट करून घ्या: आपल्या जोडीदारासोबत बसून बजेट करा, आपले महिन्याचे खर्च आणि इतर जबाबदाऱ्या मांडा. वेळोवेळी त्याचा आढावा घ्या आणि तुमच्या मिळकतीतील बदल, खर्चांतील बदल इत्यादीनुसार त्यात आवश्यक ते बदल करा. मुलांनाही यात सामील करा, ज्याने त्यांना बजेट करणे शिकता येईल.

बचत करणे: बजेट करून झाल्यावर तुमच्या जोडीदार आणि मुलांसोबत खर्च कमी करण्याच्या आणि बचत वाढवण्याच्या उपायांवर चर्चा करा. तुम्ही मुलांना नव-नवीन कल्पना मांडायला सांगू शकता आणि उत्तम कल्पनांसाठी त्यांना काही बक्षीस देऊ करू शकता. अशाने त्यांना बचत करण्याची सवय लागेल.

गुंतवणूक किती आणि कुठे करावी: जर तुमच्या जोडीदाराला किंवा आई-वडिलांना तुमच्या गुंतवणुकींबद्दल माहिती नसेल, तर अचानक गरज भासल्यास आणि तुम्ही त्यांच्या सोबत नसल्यास त्यांना काहीच करता येणार नाही. अशा परिस्थितीत ते पैसे काढू शकणार नाहीत. म्हणून त्यांना तुमच्या सर्व गुंतवणुकी आणि त्यांचा कारभार माहीत असला पाहिजे.

रिटायरमेंट: या क्षणी रिटायरमेंट फार पुढची घटना वाटू शकते, पण त्याची तयारी जेवढ्या आधी सुरू कराल तेवढा तो काळ सुसह्य होईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला आणि मोठे झाल्यावर तुमच्या मुलांना सुद्धा तुमची तयारी, तुम्हाला हवी असलेली रिटायरमेंट रक्कम, रिटायरमेंट नंतरची तुमची जीवनशैली इत्यादी सर्व माहिती देणी गरजेचे आहे.

आर्थिक आणीबाणी: नोकरी जाणे, अचानकपणे आलेले आजारपण किंवा अपघात इत्यादीसाठी तुम्हाला काही रक्कम आधी बाजूला काढून ठेवली पाहिजे. या रकमेची गरज आणि त्याचे महत्व तुमच्या जोडीदाराला समजावून सांगणे गरजेचे आहे कारण अशासारख्या घटना कोणाहीसोबत घडू शकतात आणि त्यामुळे कुटुंबाची घडी विस्कळित होते. तुमच्या बजेटप्रमाणे सहा ते बारा महिन्याच्या खर्चासाठी पुरतील एवढे पैसे या निधीसाठी पुरेसे होतील.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार