‘कूलपॅड’ आणि ‘ले इको’ या दोन कंपन्या मिळून ‘कूलपॅड कूल वन’ नावाचा फोन भारतीय बाजारपेठेत घेऊन आल्या आहेत. या फोनमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे आणि त्यावर कॉर्निग गोरिला ग्लास थ्री आहे, ज्यामुळे तुमच्या फोनला ओरखडे पडायची भीती आता उरणार नाही. ज्यांना फोटो काढायची आवड आहे अशांसाठी हा एक भन्नाट फोन आहे, कारण या फोनमध्ये मागील बाजूस चक्क दोन कॅमेरे दिले आहेत आणि ते पण १३ मेगापिक्सेल. शिवाय दोन फ्लॅश आहेत, ज्यामुळे तुमचे फोटो उत्कृष्ट येण्यास मदत होईल. सेल्फीची आवड असणाऱ्यांसाठी पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. या मोबाइलचे दोन प्रकार उपलब्ध आहेत- ऑनलाइन आणि दुकानांमध्ये. जो फोन ऑनलाइन उपलब्ध आहे त्यात फोर जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी देण्यात आली आहे, तर दुकानांमध्ये जो मोबाइल उपलब्ध आहे त्यात थ्री जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही फोनमध्ये मेमरी कार्डसाठी जागा नाही, ज्यामुळे तुम्ही या फोनची मेमरी स्टोरेज वाढवू शकत नाही. हा मोबाइल अँड्रॉइड सिक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. तुम्हाला मोबाइलवर गेम खेळायला किंवा चित्रपट बघायला खूप आवडतात का? तसेच रोज तुम्ही मोबाइलचा भरपूर वापर करता का? असं असेल तर कूलपॅड कूल वन एक उत्तम पर्याय आहे. कारण या मोबाइलमध्ये कॉलकॉमचा ६५२ ऑक्टा कोर सीपीयू आणि अड्रिनोचा ५१० जीपीयू वापरला आहे. ज्यामुळे रोजच्या वापरात व्हिडीओ बघणे, गेम खेळणे, फोटो काढणे हे तुम्ही विनाअडथळा करू शकता. आपण फोनची बॅटरी संपू नये म्हणून सोबत अजून एक फोन किंवा पॉवरबँक घेऊन जातो. पण आता तसे करण्याची गरज नाही, कारण कूलपॅड कूल वन मध्ये चार हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, ज्याच्यामुळे फोनची बॅटरी एक ते दोन दिवस टिकते. या मोबाइलमध्ये दोन सीम कार्डाची तसेच टूजी, थ्रीजी, फोरजी आणि व्हीओएलटीईची सुविधा आहे. यात वायफाय, जीपीएस, ब्लू-टुथ, एफएम, यूएसबी टाईप सी (मोबाइल चार्ज करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान असलेली वायर) आहे आणि तुमचा पेन ड्राइव्ह या मोबाइलला जोडू शकता. फोनच्या सुरक्षेच्या दृष्टीने मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे, ज्याचा उपयोग स्क्रीन अनलॉक करण्यासाठी करू शकता. हा मोबाइल चंदेरी आणि सोनेरी या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

फायदे:

  • कॅमेऱ्याची आवड असणाऱ्यांसाठी एक भन्नाट फोन. कारण यात मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे
  • कॉर्निग गोरिला ग्लास थ्री वापरल्यामुळे फोनवर कुठल्याही प्रकारचा ओरखडा येणार नाही
  • ऑनलाइन आणि दुकानांमध्ये दोन्ही ठिकाणी उपलब्ध
  • चार हजार एमएएचची बॅटरी देण्यात आल्यामुळे तुम्ही दिवसभर हा मोबाइल सहज वापरू शकता.

तोटे:

  • या फोनमध्ये मेमरी कार्डसाठी जागा नाही ज्यामुळे तुम्ही या फोनची मेमरी स्टोरेज वाढवू शकत नाही.
  • दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या मोबाइलची रॅम ही ऑनलाइन उपलब्ध असलेल्या मोबाइलपेक्षा कमी
  • या मोबाइलमध्ये अँड्रॉइडची जुनी आवृत्ती देण्यात आली आहे.

 

मोबाइल किंमत:
फोर जीबी रॅम / ३२ जीबी मेमरी
रु. १३,९९९/-
(फक्त ऑनलाइन उपलब्ध)

थ्री जीबी रॅम/ ३२ जीबी मेमरी
रु. १३,४९९/-
(फक्त दुकानांमध्ये उपलब्ध)

सौजन्य : लोकप्रभा