डॉ. सोनल आनंद, मानसोपचारतज्ज्ञ

वर्षभर करोनाचे थैमान घातल्याने समाजात एकप्रकारची अस्थिरता निर्माण झाली होती. त्यात टाळेबंदीच्या भीतीमुळे लोकांच्या मनातील लहरी सातत्याने बदलत आहे. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता कुठे आर्थिक स्थिती सावरत होती, त्यात दुसरी लाट आल्यामुळे मानसिक तणावात अधिक वाढ होऊ  लागली आहे. या मानसिक आजाराचे मुख्य कारण आर्थिक बाब तर आहेच. परंतु लोकांच्या मानसिक स्थितीबरोबरच शारीरिकही बदल होत असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होत आहे. परिणामी अशा लोकांना करोनाचा धोका सर्वाधिक संभवू शकतो.

२०२० मध्ये कोविड-१९ या विषाणूने संपूर्ण जगभरात एकच हाहाकार माजवला होता. करोनाशी मुकाबला करून ही साखळी मोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून टाळेबंदी जारी करण्यात आला. त्यात अनेकांच्या नोकऱ्या जाऊन कायमच घरी बसावं लागलं. त्यात आजाराचा संसर्ग होण्याची भीती यामुळे बहुतांश लोक मानसिक दडपणाखाली जगत होते. सप्टेंबरनंतर हळूहळू रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याने परिस्थितीत सकारात्मक बदल जाणवू लागला. आर्थिक घडी आता व्यवस्थित बसेल, असे वाटत असताना २०२१ मध्ये करोनाने पुन्हा नव्याने पाय रोवायला सुरुवात केली. मुख्यत: मागील वर्षीच्या तुलनेत यंदा करोना अधिक ताकदीनिशी आणि शक्तिशाली होऊन परतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील धाकधूक पुन्हा वाढली आहे.

करोनाच्या साथीमुळे देशभरातील नागरिकांना नवीन जीवनपद्धतीशी जुळवून घेणे भाग पडत आहे. करोनामुळे अधिक काळ घरातच राहिल्याने मानसिक आजार, आर्थिक असुरक्षितता आणि कामाचा ताण यासंबंधी जोखीम वाढली आहे. झोप न लागणे, जेवण कमी होणं, चिडचिडेपणा वाढणे, डोकेदुखी, सतत चिंता, मन नियंत्रणात नसल्याची भावना, नोकरीची अनिश्चितता आदी सतावत आहेत. त्यात आता राज्यात पुन्हा टाळेबंदीचं सावट घोंगावत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

करोनाबाधित रुग्णांना नैराश्य येण्याची शक्यता अधिक असते. त्यातही नैराश्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन अनेक जण बाधित होत आहेत. कोरानामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून ‘मलाही करोना होणार’, ‘माझी नोकरी जाईल’, ‘कुटुंबातील एखाद्याला लागण झाल्यास काय करावे?’ अशी शंका मनात येणे यातूनही मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सध्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या ५० टक्के रुग्णांच्या मनात करोनामुळे भीती असल्याने त्यांच्या बोलण्यावरून समोर येत आहे. मुळात पहिल्या टाळेबंदीत लोकांना फारशी कल्पना नव्हती की काय परिस्थिती ओढवू शकते. परंतु आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागली तर अधिक वाईट स्थिती निर्माण होऊ  शकते. हे आपल्याला माहिती आहे. यामुळे टाळेबंदी कधी आणि किती दिवसांसाठी असणार असे विचार सतत मनात येत असल्याने लोक घाबरून गेले आहेत.

करोनामुळे ऐकिवात येणाऱ्या गोष्टींमुळे नैराश्य वाढले आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी रात्री पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे, समाजमाध्यमे आणि टीव्हीच्या माध्यमातून करोनाबद्दल देण्यात येत असलेल्या बातम्या जास्त पाहू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा, नियमित व्यायाम करा, योगा आणि ध्यान केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यात मदत मिळते. कुटुंबातील वादविवाद टाळायचे असतील तर कुटुंबीयांसह संवाद साधा, आवडीच्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रयत्न करा. तसेच मित्रमैत्रिणींशी फोन किंवा व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून मनातील भावना व्यक्त करा. यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहिलं. या कठीण कालावधीत मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यासाठी मनावर ताबा मिळवणं गरजेचं आहे यासाठी प्रयत्न करा.