News Flash

वाहनांचे ‘आरोग्य’ही बिघडतंय!

करोनामुळे गेली दीड वर्षे कधी टाळेबंदी तर कधी संचारबंदी लागू केल्यामुळे प्रवासावर निर्बंध येत आहेत.

अनिल पंतोजी

करोनामुळे गेली दीड वर्षे कधी टाळेबंदी तर कधी संचारबंदी लागू केल्यामुळे प्रवासावर निर्बंध येत आहेत. त्यामुळे वाहनांतून होणारा दररोजचा प्रवास कमी झाला आहे. किंबहुना अनेकांची वाहने ही पार्किंगमध्ये महिनोन्महिने उभी होती. करोनामुळे त्याच्या देखभालीकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनांमध्ये दुरुस्तीची मोठी कामे निघत आहेत. नुकतीच संचारबंदी उठल्यानंतर अनेकांनी आपली वाहने घराबाहेर काढली मात्र त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सद्य:परिस्थितीत देखभाल दुरुस्तीसाठी मोठय़ा  प्रमाणात वाहने दिली जात आहेत. अनेकांकडे अगदी दुरुस्तीसाठीही आता वेटिंग सुरू झाले आहे. एकीकडे आर्थिक भुदर्र्डही बसत असताना वेळेत वाहन मिळत नसल्याने अनेकांची अडचण होत आहे. ही सर्व गैरसोय टाळण्यासाठी वाहनांचे ‘आरोग्य’ही नित्यनियमाने तपासणे गरजेचे आहे.

वाहनाचे वर्गीकरण, माहिती व देखभाल

वाहनांचे वर्गीकरण त्याचा वापर, त्याची आसन किंवा भारक्षमता, उत्पादकाचे नाव व नमुना, लागणारे इंधन, वाहनास असलेली चाके व त्याची ट्रान्समिशन प्रणाली यावरून केले जाते. वाहनामध्ये विविध यंत्रणा कार्यरत असतात. त्यामध्ये वाहनाचे इंजिन, स्टिअिरग प्रणाली, ब्रेकिंग प्रणाली, लुब्रिकेशन व इंधन प्रणाली, कुिलग प्रणाली व ट्रान्समिशन प्रणाली इ. समावेश होतो.

‘वाहन सुस्थितीत ठेवणे’ हे प्रत्येक चालक व मालकाचे काम आहे, ते कायद्यानेदेखील बंधनकारक आहे. सुस्थितीतील वाहनामुळे अपघात टाळता येतात, वेळ व इंधन बचत होते तसेच वाहतूक कोंडी व प्रदूषण टाळता येते. वाहनाची देखभाल ही त्याची धाव किंवा कालावधी यावर अवलंबून असते. वाहने आधुनिक असल्यामुळे ‘मान्यताप्राप्त सव्‍‌र्हिस सेंटर’च्या मार्फतच त्याची देखभाल करून घ्यावी. आपण लक्षात ठेवले पाहिजे की, वाहनातील कोणतीही यंत्रणा नादुरुस्त होण्याआधी तसे संकेत आपणास वाहनाच्या डॅशबोर्डवरील चिन्हांद्वारे मिळत असतात. वाहन चालविताना अचानक होणारे बदल, आवाज किंवा वास याची दखल घेतलीच पाहिजे.

दैनंदिन देखभाल

रोजचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपले वाहन व पुढील, मागील काचा पाण्याने स्वच्छ करून घ्याव्यात. वाहनाच्या आतील मॅटिंग झटकून घ्याव्यात. प्रवासास आवश्यक इंधनसाठा असण्याची खात्री करावी. टायर्सची स्थिती व हवेचा दाब जाणून घ्यावा, वाहन सुरू करून पुढे घेत ब्रेक तपासून घ्यावे, वाहनाचे सर्व दिवे कार्यक्षम असल्याची खात्री करावी व सर्वात महत्त्वाचे वाहनातून इंधन, वंगण, पाणी गळती होत नसल्याची खात्री करावी. पावसाचे आगमन झाले आहे. दरवर्षीप्रमाणे अतिवृष्टी, रस्त्यांवर पाणी साठणे, वाहतूक बंद या बातम्या ऐकायला किंवा प्रत्यक्ष अनुभवता येतील. अनेकवेळा वाहने बंद पडलेलीसुद्धा दिसतील. हा अनुभव आपणास येऊ नये किंवा तो टाळावा कसा याकरिता वाहनांची देखभाल करून घ्यावी किंवा किमान खालील बाबींची तपासणी करावी.

वायपर

वाहनाचे वायपर ब्लेडस् दरवर्षी बदलावेत, कारण उन्हाळ्यातील तापमानामुळे ते कडक होतात व त्याला तडे जातात. जर ते तसेच वापरले तर काचांना ओरखडे पडतात. वायपर तपासताना त्यांना वेगवेगळे तपासावेत. तसेच वॉशर बॉटलमधील पाणी तपासावे, गरज वाटल्यास त्यात डिर्टजट मिसळावे त्यामुळे काचेवरील तेलकट डाग निघून जातात. पाण्याचा काचेवरचा फवारा काचेवरच मारला जाईल अशा खात्रीकरिता नोझल्स् तपासावेत.

ब्रेक प्रणाली

वाहनाचा तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाचा अवयव म्हणजे ब्रेक प्रणाली. ब्रेक पेडल खूप कडक (हार्ड) नकोत किंवा ते खूप नरम (स्पाँजी)देखील नकोत. एबीएस ब्रेकिंग प्रणाली बसविली असल्यामुळे वाहन घसरत नाही किंवा ते भरकटतदेखील नाही. तसेच त्यामुळे वाहनाच्या दिशेवर व वेगावर योग्य नियंत्रण राखता येते. वाहनाचे ब्रेक ड्रम, डिस्क, पॅड, ब्रेक कॅलिब्रेशन तपासावेत व सव्‍‌र्हिसिंग करून घ्यावे.

दिवे

वाहनाचे हेडलाईट, दिशादर्शक, पार्किंग लाईटस् तपासून घ्याव्यात. पावसात अंधुकता असल्यास पार्किंग दिव्यांचा वापर करावा. वाहनाचे हजार्डस् लाईटसचा वापर करू नये. हे दिवे फक्त वाहन थांबलेले असतानाच किंवा आणीबाणीच्या वेळेसच वापरतात.

वातानुकूलिन यंत्रणा

वाहनाच्या ए/सीची कार्यक्षमता तपासावी. हवेचा प्रवाह काचांच्या दिशेने पसरल्यास काचा स्वच्छ होतात. रात्रीच्या वेळेस धुक्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रकाशाचे अपवर्तन होते व समोरील रस्ता नीट दिसत नाही. त्या वेळीदेखील ए/सीचा वापर उपयोगात येतो. काचा पुसताना वर्तमानपत्राचा वापर करणे सर्वात चांगले कारण कागद आद्र्रता शोषून घेतात.

स्वच्छता

पावसाळ्यात आपल्या कपडय़ांना, बुटांना दमटपणा आलेला असतो तर कधी-कधी ते ओले असतात. ओलसर व दमटपणामुळे मॅटिंग खराब होतात, त्याला बुरशी लागते व त्याचा दरुगध येत असतो. तो टाळण्याकरिता प्लास्टिक मॅटिंग वापराव्यात. त्यावर कागद पसरून ठेवावेत व चांगल्या प्रतीचा परफ्युम वापरले तर वाहनाच्या आतील वातावरण स्वच्छ, प्रसन्न राहील.

चाके

वाहन व रस्ता यामधील दुवा म्हणून चाके काम करतात. सुरक्षित प्रवासाकरिता चाकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ते धक्के सहन करतात व वाहनाचा भार पेलतात. चाकांमधील हवेचा दाब तज्ज्ञांच्या शिफारशीप्रमाणे ठेवावा. सध्या हवेऐवजी नायट्रोजन गॅसचा वापर केला जातो. टायर्स नेहमी चांगल्या, धडधाकट स्थितीत असावे व त्याची खोबणी खोली १.६ मि.मि.पेक्षा जास्त असावी. चाके जितकी नक्षीदार तेवढा त्याचा रस्त्याशी संबंध/ संपर्क जास्त, त्यामुळे पाण्यात, निसरडय़ा रस्त्यावरून वाहन तरंगण्याची/ घसरण्याची शक्यता कमी. वाहनाचे व्हील व बॅलिन्सग अलाइनमेंट तपासून घ्यावे.

वायरिंग

वाहनातील वायिरग उघडे, मोकळे किंवा सुट्टे झाले असेल तर ते दुरुस्त करावे जेणेकरून शॉर्टसर्किटचा अनर्थ टळेल. वाहनातील सर्व विद्युत यंत्रणा कार्यक्षम असल्याची खात्री करा. बॅटरीच्या टर्मिनलना नेहमी पेट्रोल जेली लावा. बॅटरी जर सल बांधली असेल तर ती क्षीण होत जाते. बॅटरीचे टर्मिनन्सवर अ‍ॅसिड व क्षार डिपॉझिट झाले असतील तर विद्युतपुरवठा योग्यप्रकारे होत नाही. बॅटरीची तांत्रिक स्थिती वेळोवेळी तपासून घ्यावी.

संरक्षण

वाहन गंजू नये, खराब होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षण कोटिंग करून घ्यावे. सुटय़ा भागांवर ग्रीसचा थर लावावा. तुटलेले रबरी भाग सल झाले असतील तर ते वेळीच बदलावेत त्यामुळे वाहनात पाणी झिरपणार नाही. तसेच वाहनांवरील ओरखडे, पोचे, छिद्रे भरून घ्यावीत. वाहनात रिफ्लेक्टर त्रिकोण, अतिरिक्त बल्ब, फ्युज, दोरखंड व एक छत्री बाळगावी.

बाजारात नवीन काय?

नवीन रेंज रोव्हर वेलार भारतात सादर

जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने बुधवारी भारतामध्ये नवीन रेंज रोव्हर वेलार कार विक्रीस सुरुवात झाल्याची घोषणा केली. नवीन वेलार इंजेनियम २.० लिटर पेट्रोल व डिझेल पॉवरट्रेन्समधील आर-डायनॅमिक एस ट्रिममध्ये उपलब्ध आहे. २.० लिटर पेट्रोल इंजिन १८४ केडब्ल्यू शक्ती व ३६५ एनएम टॉर्क देते आणि २.० लिटर डिझेल इंजिन १५० केडब्ल्यू शक्ती व ४३० एनएम टॉर्क देते. नवीन रेंज रोव्हर वेलारची भारतामध्ये एक्स-शोरूम किंमत ७९.८७ लाख रुपयांपासून आहे.

जॅग्वार लँड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले, रेंज रोव्हर वेलार ही अत्याधुनिक डिझाइन, लक्झरी व तंत्रज्ञानाच्या अद्वितीय संयोजनामुळे भारतातील उच्च श्रेणीतील हवीहवीशी वाटणारी अशी एसयूव्ही आहे. नवीन अवतारामध्ये नवीन तंत्रज्ञान व सुविधाजनक वैशिष्टय़ांच्या सादरीकरणासह रेंज रोव्हर वेलार अधिक लोकप्रिय बनली आहे.

नवीन रेंज रोव्हर वेलारमध्ये उत्साहवर्धक नवीन वैशिष्टय़े आहेत- जसे थ्रीडी सराऊंड कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक एअर सस्पेन्शन, केबिन एअर आयोनायझेशनसह पीएम २.५ फिल्टर आणि नवीन पीव्ही प्रो इन्फोटेन्मेंट सिस्टीम. ही सर्वात आकर्षक, सुरक्षित व स्मार्टर व्हेईकल असण्यासोबत जगातील तंत्रज्ञानदृष्टय़ा सर्वात प्रगत लक्झरी एसयूव्ही आहे.

किंमत ७९.८७ लाख रुपयांपासून

ह्य़ुंदाईची अल्काझार

ह्य़ुंदाईची बहुप्रतीक्षित सात आसनी अल्काझार (Alcazar) या एसयूव्हीची प्रतीक्षा संपली असून ती १८ जून रोजी भारतीय बाजारात येत आहे, तशी घोषणा कंपनीने केली आहे.

इंजिनसाठी पेट्रोल आणि डिझेल असे दोन पर्याय मिळतील. पेट्रोल व्हेरियंटमध्ये २.० लिटर क्षमतेचे इंजिन असू शकते. हे इंजिन १५९ पीएस ऊर्जा आणि १९२ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. याशिवाय, डिझेल व्हेरिअंटमध्ये १.५ लिटर क्षमतेचे इंजिन असण्याची शक्यता आहे. हे इंजिन ११५ पीएस ऊर्जा आणि २५० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यासोबत ६ स्पीड मॅन्युअल आणि स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असेल.

ही एसयूव्ही ७-सीटर आणि ६-सीटर अशा दोन प्रकारांत येईल. केट्राच्या तुलनेत ही एसयूव्ही ३० मिलिमीटर लांब असेल. शिवाय, व्हीलबेसही २० मिलिमीटर उंच असेल. कारच्या केबिनमध्ये सेंटर आर्मरेस्टसोबत कॅप्टन सीट असेल, तर स्टाइलच्या बाबतीत ही कट्राप्रमाणे असणार आहे. या कारची किंमत १२ ते १८ लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही कार बाजारात येण्याआधीच तिचे मायलेज किती असेल याबाबतची माहिती समोर आली असून ही कार स्पर्धक कारपेक्षा जास्त मायलेज देईल, कार पेट्रोल-मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक प्रकारामध्ये सारखाच म्हणजे १४ किलोमीटर प्रति लिटरचा मायलेज देईल. तर, डिझेल मॅन्युअल  सर्वाधिक म्हणजे २०.४ प्रति लिटर मायलेज देईल. याशिवाय, डिझेल-ऑटोमॅटिक मायलेज मात्र थोडा कमी असेल. यामध्ये १८ किलोमीटर प्रति लिटर इतका मायलेज मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 12:07 am

Web Title: corona virus health vehicles deteriorating highway bike cars ssh 93
Next Stories
1 तांदूळ शिजवण्याआधी उकळत्या पाण्यात ‘या’ दोन गोष्टी टाका अन् भात चिकटण्याची समस्या टाळा
2 डोळ्यांचे विकार दूर करण्यासाठी करा या पाच गोष्टी….
3 रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी करा काळ्या मिरीचा वापर
Just Now!
X