नवीन कोरोना विषाणूचा धोका कायम असतानाच भारतीय औषध महानिरीक्षकांनी एचआयव्हीवरील दोन औषधे कोरोना विषाणूसंसर्गावर मर्यादित प्रमाणात वापरण्यास मंजुरी दिली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दोन औषधांना कोरोना विषाणू संसर्गावर मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्या दोन औषधांची नावे लोपिनवीर व रिटोनवीर अशी आहेत. त्यांचा वापर श्वसनाच्या रोगांसाठीही करता येतो. कोरोना विषाणूमुळे न्यूमोनिया होत असल्याने त्यावर ही औषधे मर्यादित प्रमाणात वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

चीन व थायलंडमध्ये कोरोना विषाणूवर वेगवेगळ्या औषधांचा वापर करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर लोपिनवीर व रिटोनवीर या दोन औषधांचा वापर मर्यादित प्रमाणावर करावा, असे औषध महानिरीक्षक कार्यालयाने म्हटले आहे. भारतात कोरोनाच्या संशयामुळे केरळात २००० लोकांना देखरेखीखाली ठेवले आहे. कोरोना विषाणूवर लस तयार करण्यासाठी अमेरिकाही प्रयत्नशील असून त्यांनी यापूर्वी इबोलावर तयार केलेले औषध गुणकारी ठरले आहे.

रेमडेसीवीर असे या औषधाचे नाव असून त्याच्यामुळे चीनमध्ये अनेकांना बरे वाटले आहे. क्लोरोक्विन फॉस्फेट, फॅवीपीरावीर या औषधांचाही उपयोग यात तपासण्यात आला आहे. त्यात रेमडेसीवीर व क्लोरोक्विन ही दोन औषधे प्रभावी ठरली आहेत. क्लोरोक्विनचा वापर १९४० पासून मलेरियावरचे औषध म्हणून केला जात आहे. रेमडेसवीर हे औषध अमेरिकेच्या गिलीड या कंपनीने तयार केले आहे.