जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. भारतामध्येही दिवसोंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. सोमवार (११ मे २०२०) सकाळपर्यंत भारतातील करोनाग्रस्तांचा आकडा ६७ हजारांहून अधिकवर पोहचला आहे. तर करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची भारतातील संख्या दोन हजारहून अधिक झाली आहे. भारताबरोबरच अमेरिका, इंग्लंड, इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनीसारख्या बड्या देशांमध्येही दिवसोंदिवस करोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत आहे. असं असतानाच आता एका संशोधनामध्ये करोना आणि ड जीवनसत्वाचा (व्हिटॅमीन डी) थेट संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. २० युरोपीय देशामध्ये केलेल्या संधोशधनामधून ज्या देशांत नागरिकांमध्ये ड जीवनसत्वाचा आभाव होता त्या देशामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट झालं आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.

युनायटेड किंग्डममधील एंजोलिया रस्कीन विद्यापीठ (एआयू) आणि क्वीन एलिजाबेथ रुग्णालयातील किंग्स लीइ एनएचएस फाउण्डेशन ट्रस्टच्या संशोधकांनी संयुक्तरित्या केलेल्या या संशोधनाचा अहवाल एजिंग क्लिनिकल अॅण्ड एक्सपिरिमेंटल रिसर्च या जर्नलमध्ये छापून आला आहे. या संशोधनानुसार इटली आणि स्पेनसारख्या देशामधील नागरिकांमध्ये उत्तर युरोपमधील अन्य देशांतील नागरिकांपेक्षा ड जीवनसत्वाचा अभाव अधिक होता असं आढळून आलं. या दोन्ही देशामध्ये इतर युरोपीय देशांच्या तुलनेत करोनामुळे अधिक मृत्यू झाले आहेत. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार या देशामध्ये करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या अधिक असण्यामागील मुख्य कारण हे उन्हामध्ये न जाणं आहे. दक्षिण युरोपमध्ये लोकं खास करुन वयस्कर लोकं उन्हामध्ये जात नाहीत.  त्वचेला पुरेसा सुर्यप्रकाश न मिळाल्याने नैसर्गिक पद्धतीने शरीरामध्ये ड जीवसत्व तयार होत नाही, असं संशोधकांचे म्हणणे आहे. करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या २० युरोपीयन देशामधील मृत्यूदराच्या आधारावर हे संशोधन करण्यात आलं आहे.

किती वेळ उन्हात बसावे?

एम्समधील ऑर्थोपेडिक्स विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर विवेक दिक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार सामान्यपणे एखाद्या व्यक्तीच्या शरिरामध्ये किमान दोन हजार आय यू ड जीवनसत्व असणे आवश्यक आहे. ड जीवनसत्व मिळवण्याचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे सुर्यप्रकाशात फिरणे हा आहे. सुर्यप्रकाश हा ड जीवनसत्वाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. सकाळी आठ ते दहा या कालावधीमध्ये किमान ३० ते ३५ मिनिटांसाठी सुर्याची कोवळी किरणे त्वचेवर पडावीत अशा पद्धतीने भटकणे किंवा घरातील बाल्कनीमध्ये बसणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हे शक्य न झाल्यास सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीमध्ये १५ मिनिटांसाठी उन्हात फेरफटका मारला तरी फायदा होऊ शकतो. चेहरा, हात, मान आणि पाठीवर ऊन पडणे गरजेचे आहे. उन्हाचा त्रास होत असल्याच थोड्या थोड्यावेळात उन्हात बसावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.

करोना आणि ड जीवसत्वाचा काय संबंध?

करोनाचा विषाणू म्हणजेच सार्क कोविड-२ हा शरीरामध्ये सायटोकिन्स अधिक प्रमाणात बनवतो त्यामुळे याला प्रो-सायटोकिन विषाणू म्हणून ओळखलं जातं. या अतिरिक्त सायटोकिन्सच्या निर्मितीमुळे रुग्णाच्या फुफुसांना सूज येते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होतो. परिस्थिती गंभीर झाल्यास रुग्णाला बॅक्टेरियल म्युमोनिया होण्याचीही शक्यता असते. ड जीवनसत्व शरिरामधील पांढऱ्या पेशींना नियंत्रणात ठेवतं. पांढऱ्या पेशींमुळे प्रो सायटोकिनची अधिक निर्मीती होण्याला निर्बंध घातला जातो.