– डॉ. भरेश देढिया

भारतात मान्सूनच्या आगमनाबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मान्सूनमुळे कोविड-19चे संक्रमण कमी होईल की आणखी वाढेल? दमटपणामध्ये घट होण्याच्या तुलनेत, दमटपणामध्ये वाढ झाल्याने विषाणू जिवंत राहण्याची शक्यता अधिक वाढू शकते. या संदर्भात अन्यही काही घटक महत्त्वाचे ठरणार आहेत. आर्द्रता अत्याधिक असल्यास विषाणूचे वहन करणाऱ्या सूक्ष्म बिंदूंवर ड्रॅग इफेक्ट दिसून येऊ शकतो आणि त्यामुळे विषाणू हवेमध्ये सोडून दिले जाण्याऐवजी ते पृष्ठभागांवर सोडले जाऊ शकतात.

अत्याधिक वाऱ्यांमुळेही सूक्ष्म बिंदू विशिष्ट भागांमध्ये विषाणू सोडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. कोणते घटक अधिक महत्त्वाची भूमिका बजावतात, हे ठरवण्यासाठी अभ्यास करण्याची गरज आहे, परंतु तोपर्यंत आपण सावध राहायला हवे. आपल्याकडे असलेले उच्च तापमान आणि गरम उन्हाळा यामुळे भारतात विषाणूचे संक्रमण रोखले जाईल, असे बोलले जात होते. परंतु, दुर्दैवाने तसे घडले नाही आणि संपूर्ण उन्हाळ्यात आपल्याकडच्या रुग्णांची संख्या वाढत राहिली. हा विषाणू नवा असल्याने अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांची उत्तरे कालानुरुपच मिळणार आहेत.

हवामानातील बदलांमुळे विषाणूच्या संक्रमणामध्ये मोठे योगदान मिळाल्याचे आतापर्यंत तरी आढळलेले नाही. याचे कारण म्हणजे, हा विषाणू जगाच्या कानाकोपऱ्यात आणि निरनिराळ्या प्रकारचे व बदलते हवामान असणाऱ्या प्रदेशांपर्यंत पोहोचलेला आहे. काही कालावधीने, प्रत्येक श्वसनविषयक विषाणूच्या बाबतीत घडतात तसे हंगामानुसार काही बदल घडतील. उष्णता अधिक असलेल्या प्रदेशांच्या तुलनेत थंड हवामान असणाऱ्या प्रदेशामध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होईल. त्यामुळे लसीकरण अधिक महत्त्वाचे ठरणार आहे आणि हिवाळ्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ते शोधून काढणे गरजेचे असणार आहे.

भारतात मान्सूनच्या कालावधीत, आपण सर्वांनी विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. शास्त्रीयदृष्ट्या, आर्द्रतेमध्ये वाढ झाल्याने संक्रमणाची शक्यता वाढू शकते. आपण मास्क घालणे आणि शक्य तितके सोशल डिस्टन्सिंग पाळणे यापुढेही सुरू ठेवायला हवे. प्रवास करत असताना विशेष काळजी घ्यायला हवी, विशेषतः प्रचंड गर्दी असलेल्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेतून प्रवास करत असताना सावधगिरी बाळगायला हवी. शक्य असेल तेव्हा तेव्हा खासगी वाहनांचा वापर करावा आणि हातांची स्वच्छता कटाक्षाने राखावी.

मलेरिया, डेंग्यू, पाण्याद्वारे पसरणारे आजार अशा मान्सूनशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली तर यातील अनेक आजारांची लक्षणे कोविड-19 सारखी असल्याने निदान करण्याची प्रक्रिया आणखी क्लिष्ट होईल. डॉक्टरांना मान्सूनशी संबंधित आजार व कोविड-19 यामध्ये फरक करण्यासाठी रुग्णाचा इतिहास बारकाईने पाहावे लागेल, तपासणी करावी लागेल आणि थ्रोट व नेसल स्वॅब अशा प्राथमिक चाचण्या करावया लागतील. परंतु, काही रुग्णांना एकाच वेळी डेंग्यू व कोविड-19 झाल्याचे वृत्तपत्रांतील लेखांमध्ये नुकतेच प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे हे आजार आणि कोविड-19 एकाच वेळी होऊ शकतात, हे ध्यानात घ्यायला हवे.

(लेखक खार येथील हिंदूजा हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ क्रिटिकल केअरचे प्रमुख आहेत)