डॉ निमित शहा
करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्यामुळे या काळात लहान मुले आणि वयस्क व्यक्ती यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यासोबतच ज्यांना हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच या व्यक्तींनी सध्यपरिस्थितीमध्ये कोणती काळजी घ्यावी हे डॉ. निमित शहा यांनी सांगितलं आहे.

करोना हे एका विषाणू समूहाचे नाव आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास कोविड-19 असे नाव दिले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं कोरोनाला जागतिक आरोग्य संकट घोषित केलं आहे. कोरोनाच्या या विषाणूचं शास्त्रीय नाव आहे Sars Cov-2 असं आहे. या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यावर तो शरीराला चिटकून बसतो. श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. हा विषाणू सर्वांत आधी घशाच्या आसपासच्या पेशींना लक्ष्य करतो. त्यानंतर श्वसननलिका आणि फुफ्फुसांवर हल्ला चढवतो. श्वसननलिका आणि फुफ्फुसांमध्ये करोना विषाणूंच्या संख्येत वाढ होते. या ठिकाणी तयार झालेले नवीन कोरोना विषाणू इतर पेशींवर हल्ला करतात. तज्ज्ञांच्या मते करोना संसर्गामुळे वृद्धांच्या आणि आधीपासूनच एखादा गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका असू शकतो. यामध्ये –हदयरोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना कोरोना सारख्या आजाराचा संसर्ग लवकर होण्याचा धोका अधिक असतो.

हृयविकाराच्या रुग्णांनी घ्या ही खबरदारी

१. स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरात अथवा घराबाहेर असताना स्वच्छ पाणी प्यावे. यासोबतच फळे अथवा फळांचा रस घ्यावा. ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहाल. मात्र लक्षात ठेवा फळे खाण्यापूर्वी ती स्वच्छ आणि गरम पाण्याने धुवून घ्यावीत.

२. मद्याचे सेवन टाळावे. आहारातील मीठाचे प्रमाण कमी करावे. शक्यतो ताजे,गरम अन्नाचे सेवन करावे.

३. स्वयंपाक करण्यापूर्वी, बाहेरून आल्यानंतर, खाण्यापूर्वी, चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. खोकताना तसेच शिंकताना तोंडावर हात अथवा रुमाल धरावा.

४. घराबाहेर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. मित्रपरिवार, पाहुणे मंडळीना घरी येण्याचे आमंत्रण देऊ नका. आजारी व्यक्तींशी संपर्कात येणार नाही यादृष्टीने विशेष खबरदारी घ्या.

५. आवश्यक औषधांचा पुरेसा साठा करून ठेवा. स्वतःच्या मर्जीने कोणत्याची औषधाचे सेवन करू नका. कोणतेही औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
६. कोलेस्ट्रॉल, मधुमेह, रक्तदाबाचे अचूक व्यवस्थापन करा. तणापासून दूर रहा जेणेकरून उच्च रक्तदाबासारख्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. ताण तणावापासून दूर राहण्याकरिता योगाभ्यास, मेडिटेशनचा आधार घ्या.

७. शारीरिक व्यायामाला प्राधन्य द्या. घरच्या घरी योगाभ्यास करा. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होईल तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहिल.

८. व्यायाम करताना हृदयरोगींनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणते व्यायामप्रकार करणे हिताचे ठरेल याविषयी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानुसार शारीरिक व्यायाम करणं योग्य ठरेल.

(डॉ. निमित शहा, सर एच एन एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट आहेत.)