करोना व्हायरसमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने दोन दिवसांपूर्वीच Work@Home ब्रॉडबँड प्लॅन लाँच केलाय. त्यानंतर आता महानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात एमटीएनएलनेही आपल्या सर्व ब्रॉडबँड प्लॅनमध्ये डबल डेटा देण्याची घोषणा केली आहे.

एमटीएनएलची ही ऑफर लँडलाइन आणि मोबाइल ब्रॉडबँड या दोन्ही युजर्ससाठी आहे. पण, एमटीएनएलच्या या ऑफरचा फायदा दिल्ली आणि मुंबई या दोन सर्कलमधील ग्राहकांनाच मिळेल. दिल्ली आणि मुंबई दोन्ही सर्कलमध्ये एक महिन्यासाठी डबल डेटा ऑफर मिळेल, अशी माहिती कंपनीने ट्विटरद्वारे दिली आहे. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही एमटीएनएलच्या ट्विटला रिट्विट करत लोकांना वर्क फ्रॉम होमचं आवाहन दिलंय. एमटीएनएलची ही ऑफर सर्व विद्यमान ग्राहकांसाठीच असेल.

याशिवाय, टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. तर, दोनच दिवसांपूर्वी बीएसएनएलने ‘फ्री-ऑफ-कॉस्ट Work@Home’ हा नवा प्लॅन आणला आहे. जाणून घेऊया या दोन्ही प्लॅनबाबत –

जिओच्या 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळेल. डेटामर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड म्हणजे 64 kbps चा होईल. 51 दिवसांची वैधता असलेहा हा केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन आहे, त्यामुळे दररोज 2 जीबी डेटासह युजर्सना एकूण 102 जीबी डेटा मिळेल. केवळ डेटा सुविधा देणारा प्लॅन असल्याने या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉल आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

आणखी वाचा- Work From Home Pack: ‘जिओ’च्या प्लॅनमध्ये तब्बल 102 जीबी डेटा

तर, बीएसएनएलच्या झीरो कॉस्टवर मिळणाऱ्या Work@Home प्लॅनसाठी मंथली डिपॉझिट किंवा इंस्टॉलेशन चार्ज देण्याचीही गरज नाही. या प्लॅनमध्ये दररोज 10Mbps च्या स्पीडने 5 जीबी डेटा मिळेल. डेटामर्यादा संपल्यानंतर स्पीड 1Mbps चा मिळेल. या प्लॅनची खासियत म्हणजे 5 जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतरही कंपनीने एफयूपी मर्यादा ठेवलेली नाही. व्हॉइस कॉलिंगची कोणतीही नवी सुविधा या प्लॅनमध्ये मिळणार नाही, कॉलिंगसाठी अ‍ॅक्टिव्ह प्लॅनच्याच सुविधा मिळतील. नवीन प्लॅन केवळ इंटरनेट डेटा बेनिफिटसाठी आहे. पण, बीएसएनएलच्या या प्लॅनचा फायदा सध्या लँडलाइन कनेक्शन असलेल्यांनाच मिळेल. नवीन कनेक्शन घेणाऱ्या युजर्सना याचा फायदा मिळणार नाही.