स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र सध्या करोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढल्याने स्मार्टफोनही जपून वापरण्याची गरज आहे. दिवसभरामध्ये आपला फोन कोणकोणत्या गोष्टींच्या संपर्कात येतो हे आपल्याला अनेकदा ठाउकही नसतं. त्यामुळेच करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:बरोबर स्वत:च्या स्मार्टफोनची काळजी घेणे गरजेचं आहे. जगभरातील आरोग्य तज्ज्ञ लोकांना चेहऱ्याला कमीत कमी वेळा हात लावा किंवा हात लावताना काळजी घ्या असा सल्ला देत आहेत. मात्र त्याचबरोबर आता चेहऱ्याशी थेट संपर्क येणाऱ्या स्मार्टफोनचीही काळजी घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांच म्हणणं आहे.

स्मार्टफोनमधून ससंर्ग होण्याची शक्यता असली तरी स्मार्टफोनवर करोनाचा विषाणू किती काळ राहतो असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) २००३ साली पहिल्यांदा अढळून आलेला सार्क-कोव्ही (SARS-CoV) हा विषाणू एखाद्या काचेच्या पृष्ठभागावर ९६ तास म्हणजेच जवळजवळ चार दिवस जिवंत राहू शकतो असं अभ्यासामध्ये निदर्शनास आलं होतं. तर स्टेनलेस स्टील आणि प्लॅस्टीकवर हा विषाणू ७२ तास म्हणजेच तीन दिवस राहू शकतो असंही निरिक्षणांमधून दिसून आलं होतं.

करोनाने जगभरात थैमान घातला आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थ म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य संशोधन संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये करोनाचा विषाणू म्हणजेच (सार्क कोवी-२) हा प्लॅस्टीक तसेच स्टेनलेस स्टीलवर तीन दिवस राहू शकतो. तर तांब्याच्या वस्तूंवर हा विषाणू चार तास राहतो असंही संशोधकांनी म्हटलं आहे. तर कार्डबोर्डवर हा विषाणू २४ तास राहतो असंही या निरिक्षणांमधून समोर आलं आहे.

अमेरिकेत करण्यात आलेल्या या अभ्यासामध्ये काचेच्या पृष्ठभागावर हा विषाणू किती काळ टिकतो हे सांगण्यात आलेले नाही. तरी करोना विषाणूचा मूळ विषाणू असणाऱ्या सार्क-कोव्हीच्या अभ्यासावरुन सध्याचा सार्क-कोव्ही २ हा विषाणू काचेवर चार दिवस राहू शकतो असं म्हणता येईल. जगभरातील बहुतांशी स्मार्टफोन हे काच आणि प्लॅस्टीकच्या पॅनलपासून बनलेले असल्याने, कोव्ही-२ म्हणजेच करोनाचा विषाणू स्मार्टफोनवर चार दिवस राहू शकतो असं म्हणता येईल.