जगभरात सर्वाना घाम फोडणाऱ्या कोरोना विषाणूने माणसाच्या फुप्फुसात कशा प्रकारे हानी होते याचा पर्दाफाश संशोधकांनी केला असून चीनमधील वुहान येथे डिसेंबर २०१९ मध्ये या विषाणूचा प्रसार प्रथम सुरू झाला होता. ‘जर्नल ऑफ थोरॅसिक ऑन्कोलॉजी’ या नियतकालिकात म्हटले आहे, की दोन रुग्णांच्या फुप्फुसाची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यात सीओव्हीआयडी १९ म्हणजे सार्स सीओव्ही व्ही २ हा विषाणू दिसून आला. त्यांच्या फुप्फुसात या विषाणूमुळे अनेक प्रकारची हानी झाली होती.

एकतर त्यात द्रव प्रथिनरूपी स्त्राव दिसून आले, याशिवाय त्यांच्या फुप्फुसाच्या उती फाटलेल्या होत्या, त्यात सूज आलेली होती. अनेक केंद्रके असलेल्या मोठय़ा पेशी तयार झाल्या होत्या. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मेडिसीन या संस्थेच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की रोगनिदान शास्त्राच्या माध्यमातून या नव्या कोरोना विषाणूचा अभ्यास प्रथमच करण्यात आला असून त्या विषाणूची लागण झाल्यानंतर प्राथमिक काळात काय दृश्य बदल फुप्फुसात दिसतात याचा शोध घेण्यात आला आहे.

यात ८४ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर असे दिसून आले, की तिच्या फुप्फुसात १.५ से.मी.ची गाठ तयार झाली होती. ती सीटीस्कॅनमध्ये दिसून आली. ऑक्सिजनेशनचे उपचारही तिच्यावर अपयशी ठरले होते. ज्याचा अभ्यास करण्यात आला तो दुसरा रुग्ण ७३ वर्षांचा पुरुष होता व त्याला कर्करोगावरील उपचारासाठी दाखल केले असता कोरोनाची लागण झाली. या रोगात विषाणूची लागण झाल्यानंतर फुप्फुसात छेद दिसतात. वुहान व जगातील इतर कोरोना रुग्णांत फुप्फुसात अशा जखमा झाल्याचे नाकारता येत नाही.