‘करोना व्हायरस’मुळे देशभरात लॉकडाउन झाल्यामुळे अनेक मजुर ठिकठिकाणी अडकलेत. आपआपल्या गावी परतण्याच्या प्रयत्नात बऱ्याच जणांची शेकडो किलोमीटर पायपीट सुरू आहे. त्यात दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांतून बिहारकडे परतणाऱ्या मजुरांची संख्या अधिक आहे. अशा अडकलेल्या मजुरांसह अन्य कामगारांच्या मदतीसाठी खासगी विमान कंपनी ‘स्पाईसजेट’ने पुढाकार घेतलाय.

लॉकडाउनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी ‘स्पाईसजेट’ने दिल्ली-मुंबई येथून पाटण्यासाठी विशेष विमान उडवण्याची तयारी दर्शवली आहे. तशाप्रकारचा प्रस्ताव कंपनीकडून सरकारसमोर ठेवलाय. “जर सरकारची परवानगी मिळाली तर आम्ही अडकलेल्या मजुरांसाठी विशेष विमान उडवण्यास तयार आहोत”, अशी माहिती ‘स्पाईसजेट’ चेअरमन अजय सिंह यांनी शुक्रवारी दिली.

“करोना व्हायरसविरोधातील लढाईमध्ये सरकार आणि जनतेच्या मदतीसाठी आम्ही नेहमी तयार आहोत. देशभरात अन्न, औषधे आणि अन्य अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी आमची विमाने आधीपासूनच उड्डाण घेत आहेत. आम्हाला अडकलेल्या मजुरांचाही त्रास कमी करायचा आहे. विशेषतः जे मजुर बिहारहून दिल्ली/मुंबई सारख्या ठिकाणी अडकलेत त्यांची मदत आम्ही करु शकतो. जर सरकारची परवानगी असेल तर आम्ही अडकलेल्या मजुरांसाठी विशेष विमान उडवण्यास तयार आहोत”, असे अजय सिंह म्हणाले.

‘स्पाईसजेट’ इंडिगो आणि गोएअरनेही सरकारसमोर करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.