मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन करणार असल्याची घोषणा केली. हा लॉकडाउन २१ दिवसांसाठी असणार आहे. यादरम्यान, अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. यादरम्यान देशभरातील आधार केंद्रही बंद राहणार असल्याची माहिती युनिक आयडेंटिटी अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) दिली आहेत. UIDAI ने ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

लॉकडाउन दरम्यान आधारचा ग्राहक हेल्पलाईन क्रमांक १९४७ हा आयव्हीआरएसमध्ये (ऑटो मोड) उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त आधारला पाठवण्यात आलेले ई-मेल किंवा आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी विलंब होणार आहे. आधार संपर्क केंद्रात कर्मचारी नसल्यानं या कामांना विलंब होईल, असं UIDAI नं सांगितलं आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांनी ऑनलाइन सेवेचा किंना एमआधार या अॅपची मदत घ्यावी असंही त्यांनी नमूद केलं आहे.

mAadhaar अॅपवर उपलब्ध सेवा
mAadhaar हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. UIDAI नुसार या अॅपवर ३५ पेक्षा अधिक सेवांचा लाभ घेता येऊ शकतो. यात आधार डाऊनलोड, आधार स्टेटस चेक, ऑर्डर आधार रिप्रिंट, बायोमॅट्रिक्स लॉक/अनलॉक, लोकेट आधार केंद्र अशा सुविधांचा लाभ घेता येतो. या अॅपद्वारे आधारचं डिजिटल व्हर्जनही आपल्याला सोबत ठेवता येतं.