करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. भारतामध्येही २४ मार्च ते १४ एप्रिल अशी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. याच लॉकडाउनदरम्यान व्हिडिओ कॉल करण्याचे प्रमाण प्रंचड वाढले आहे. याचा थेट फायदा झूम या अ‍ॅपला झाला आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये मुख्यालय असणारे हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेले अ‍ॅप म्हणून पहिल्या क्रमांकावर आले आहे. भारतामध्येही सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्सच्या यादीत हे अ‍ॅप लॉकडाउननंतर अव्वल स्थानी आलं आहे.

झूम अ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप, टीकटॉक आणि इन्स्ताग्रामसारख्या अनेक लोकप्रिय अ‍ॅप्सला धोबीपछाड देत गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाऊनलोड होणारे अ‍ॅप म्हणून अव्वल क्रमांक पटकावला आहे. झूमच्या बेसिक व्हर्जनमध्ये एकावेळेस ५० जणांना कॉन्फरन्स व्हिडिओ कॉल करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एकाच वेळेस १० हून अधिक जणांना व्हिडिओ कॉल करता येईल असं झूम हे एकमेव अ‍ॅप सध्या उपलब्ध आहे. याच कारणामुळे मागील काही दिवसांमध्ये झूम डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. घरून काम करणाऱ्या अनेकांनी ऑफिसमधील मिटींग व्हिडिओ कॉलवर होत असल्याने झूमचा आधार घेतला आहे. सध्या प्ले स्टोअरवर पाच कोटीहून अधिक जणांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केलं असून दिवसोंदिवस हे अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. एकीकडे झूम पहिल्या क्रमांकावर आलेल असतानाच व्हॉट्सअ‍ॅपची मात्र चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

करोनाच्या साथीमुळे फायदा झालेल्या कंपन्यांमध्ये झूमचा समावेश आहे. हा फायदा इतका मोठा आहे की या अ‍ॅपला क्वारंटाइनचा बादशाह असं अ‍ॅडवीक या मासिकानं म्हटलं आहे. करोना लॉकडाउनमुळे अनेकजण घरुनच काम करत असल्याने झूमला मोठा फायदा झाला आहे.