दिवाळीत घशाचा संसर्ग वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
पाऊस जाता जाता शहरात सुरू झालेल्या डेंग्यूच्या साथीचा प्रभाव ओसरला असला तरी ताप आणि खोकल्याने अनेकजण हैराण आहेत. त्यातच पाऊस गेल्याने हवेचे वाढलेले प्रदूषण, दिवाळीत फटाक्यांनी होणारा धूर आणि फराळातील तेलकट पदार्थ यामुळे घशाचा संसर्ग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महानगरपालिकेच्या रुग्णालयात ऑक्टोबर महिन्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येवरून डेंग्यूच्या साथीचा प्रभाव अखेरच्या आठवडय़ात कमी झाल्याचे दिसत आहे. या महिन्यात डेंग्यूचे ४१३६ संशयित रुग्ण दाखल करण्यात आले. आधीच्या आठवडय़ांच्या तुलनेत अखेरच्या आठवडय़ातील रुग्णांची संख्या निम्म्यावर आली होती.

डेंग्यूचा प्रभाव कमी वाटत असला तरी विषाणूसंसर्गामुळे येणारा साधा ताप तसेच मलेरिया या आजारांचा प्रभाव कायम आहे. ऑक्टोबरमध्ये पालिका रुग्णालयात तापाचे ११ हजारांहून अधिक रुग्ण तर मलेरियाचे ८६० रुग्ण दाखल झाले.
ऋतू बदलत असताना तापाची साथ किंवा खोकल्याचा संसर्ग होण्याची संख्या वाढते. त्यातच या काळात वाऱ्याचा वेग कमी झाल्याने मुंबईच्या हवेचे शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

वाढते प्रदूषण, पुढील आठवडय़ात फटाक्यांची पडणारी भर आणि फराळातील तेलकट पदार्थामुळे खोकल्याची लागण होण्याचे प्रमाण वाढू शकते, अशी शक्यता आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केली. फटाक्यांद्वारे होणारे प्रदुषण टाळण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे