प्रतिजैविके व स्टेरॉइडयुक्त औषधांच्या सरसकट विक्रीवर आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. २३ मार्च रोजी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यात एकूण १४ क्रिम्सचा समावेश करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे रुग्णांना विकण्यास बंदी घालण्यात आली असून त्यात काही मलमे व क्रिम यांचा समावेश आहे.

अनुशेष एचमधील या औषधांच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी औषध व सौंदर्यप्रसाधने नियम १९४५ मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. औषध तंत्रज्ञान सल्लागार मंडळाने केलेल्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

ही क्रिम व औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय देण्यास बंदी घातली असून काही त्वचारोगतज्ज्ञांनी औषध कंपन्या स्टेरॉइड्स असलेली क्रिम व मलम विकत असल्याची तक्रार केली होती.

या औषधांचा वापर रुग्ण कुणाच्या देखरेखीखाली करीत नाहीत. स्टेरॉइड असलेले त्वचारोगाचे मलम व इतर काही औषधांना नवीन नियम लागू केला असून चेहरा धुण्याचे फेसवॉश व मॉइश्चरायजर्स यांना हा नियम लागू नाही. अल्कोमेटॅसोन, बेक्लोमेथॅसोन, डेसोनाइड, डेसोक्झिमेटेसोन, फ्लुसिओनइड या औषधांचा बंदी घातलेल्यांत समावेश आहे.