करोनामुळे निर्माण होणारं संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. लोकांचा संपर्क कमी होऊन करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रानं हे पाऊल उचललं. आता लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात हळूहळू काही गोष्टी शिथिल केल्या जात आहेत. विशेष काही दिवसांनी कर्मचाऱ्यांची मर्यादा टाकून काही कार्यालये सुरू होतील. पण, करोनाचा संकट असतानाही ऑफिसला जाण्याची वेळ आली, तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

करोनावर अद्याप नेमकी लस सापडलेली नाही. दुसरीकडं लोकांनी करोनासोबत जगायला शिकून घ्यायला हवं, असं जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक आरोग्य तज्ज्ञ सांगत आहेत. त्यादृष्टीनं सरकारही योजना तयार करू लागलं आहे. त्यामुळे करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही ऑफिसला जावं लागू शकतं. अशा काळात ऑफिसला जाताना काळजी घेणं आवश्यक आहे.

काय काळजी घ्यायला हवी…

घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणं आवश्यक आहे.

ऑफिसला जाताना सोबत साबणाची वडी, सोप पेपर वा सॅनिटायझर ठेवावं.

स्वतःचा ग्लास, बॉटल व चमचा कायम सोबत ठेवावा जेणेकरून संसर्ग टाळता येईल.

ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून चार्जर घेणं टाळण्यासाठी स्वतःची पावर बँक आणि चार्जर सोबत बाळगा.

ऑफिसला जाण्यासाठी स्वतःचं वाहन वापर असाल, तर सर्वात जास्त स्पर्श होणारा वाहनाचा भाग नेहमी स्वच्छ असेल याची खात्री करू घ्या. जसं की दाराचं हॅण्डल, डॅश, स्टेअरिंग, गिअर, सीट आणि सीट बेल्ट आदी.

दुचाकी वापर असाल तर ती नेहमी स्वच्छ करा. सोशल डिस्टसिंगचं पालन करण्यासाठी आपली दुचाकी दुसऱ्याला देणं टाळावं.

कारमधून दोन व्यक्ती ऑफिसला जात असतील, तर बसण्याची रचना क्रॉस असावी. जसं की पुढच्या सीटवर एक, दुसरी मागच्या सीटवर.